Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
DRDO ने बनवले Turbojet Engine; भारताने अमेरिका-रशियाची केली बरोबरी

DRDO ने बनवले Turbojet Engine; भारताने अमेरिका-रशियाची केली बरोबरी

भारताने आपल्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात एक मोठी आणि ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) अंतर्गत येणाऱ्या 'गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट' (GTRE) या संशोधन पथकाने देशातील पहिल्या लहान टर्बोजेट इंजिनची रचना (Turbojet Engine) केली आहे.

हे ३५० किलो थ्रस्ट क्षमता असलेले इंजिन हैदराबादच्या ‘आझाद इंजिनिअरिंग’ कंपनीने तयार केले असून, त्याचे पहिले युनिट डीआरडीओकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या यशामुळे स्वदेशी लष्करी टर्बोजेट इंजिनची (Turbojet Engine) रचना आणि उत्पादन करण्याची क्षमता असलेल्या जगातील मोजक्या महासत्तांच्या गटात भारताने सन्मानाने प्रवेश केला आहे.

इंजिनचे वैशिष्ट्य आणि ‘एक्सपेंडेबल टर्बोजेट’ तंत्रज्ञान

सामान्य लढाऊ विमानांची (उदा. तेजस) इंजिने हजारो तासांच्या उड्डाणासाठी डिझाइन केलेली असतात. मात्र, हे ‘एक्सपेंडेबल’ (Expendable) टर्बोजेट इंजिन एकाच विशिष्ट मोहिमेसाठी तयार केले जाते. हे इंजिन (Turbojet Engine) क्षेपणास्त्र किंवा ड्रोनला प्रक्षेपणापासून लक्ष्यापर्यंत पोहोचवेपर्यंत उच्च वेग देते आणि मोहिमेच्या शेवटी शस्त्रासोबतच नष्ट होते. अनेक वर्षांच्या सेवा आयुष्याऐवजी याचा लहान आकार, हलके वजन, अचूक विश्वसनीयता आणि कमी उत्पादन खर्चावर विशेष भर दिला जातो.

हे इंजिन भारतीय सैन्यासाठी का महत्त्वाचे आहे?

या इंजिनचा (Turbojet Engine) वापर भारतीय संरक्षण दल खालील महत्त्वाच्या कामांसाठी करणार आहे. लांब पल्ल्याच्या आणि जहाजांवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांची क्षमता आणि अंतर वाढवणे. हे इंजिन अतिवेगवान मानवरहित विमानांना आणि शस्त्र चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘टारगेट ड्रोन्स’ना ऊर्जा देते. शत्रूच्या रडार यंत्रणा, कमांड सेंटर्स, इंधन आणि दारूगोळा डेपोवर ध्वनीच्या वेगापेक्षा किंचित कमी (Subsonic) वेगाने अचूक आणि खोलवर हल्ले करू शकते.

( भारत-अफगाणिस्तान जवळीकीमुळे Pakistan बिथरला; लष्कराच्या प्रवक्त्याकडून वादग्रस्त वक्तव्य)

टर्बोजेट इंजिन बनवणे कठीण का मानले जाते?

रॉकेटच्या तुलनेत कॉम्पॅक्ट टर्बोजेट इंजिन (Turbojet Engine) बनवणे अत्यंत आव्हानात्मक असते. हे इंजिन हवेतील ऑक्सिजन संकुचित करून १,००० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात इंधन जाळते. याचे सुटे भाग प्रति मिनिट हजारो फेऱ्यांच्या (RPM) वेगाने फिरतात. यामुळे अगदी बारीक चूक झाली तरी इंजिन (Turbojet Engine) नष्ट होऊ शकते. यासाठी प्रगत धातूशास्त्र आणि अचूक टर्बाइन अभियांत्रिकीची गरज असते.

निवडक देशांच्या रांगेत स्थान

आतापर्यंत हे प्रगत तंत्रज्ञान केवळ अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन या ५ देशांकडेच होते. आता भारत या तंत्रज्ञानासह ६ वा देश बनला आहे.

‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने मोठे पाऊल

पूर्वी भारताला आपल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन्ससाठी अशी इंजिने (Turbojet Engine) परदेशातून महागड्या दराने आयात करावी लागत असत. या यशामुळे परकीय अवलंबित्व तर संपणार आहेच, शिवाय या लहान इंजिनातून मिळालेले तांत्रिक ज्ञान (टर्बाइन, कंप्रेसर, साहित्याचा वापर) भविष्यात स्वदेशी लढाऊ विमानांची मोठी इंजिने बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. भविष्यातील ‘ड्रोन युद्धा’च्या काळात ही कामगिरी भारताच्या लष्करी ताकदीला एका नव्या उंचीवर नेणारी ठरेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post