Dailyhunt
तंजावरमध्ये फुललेला मराठी संस्कृतीचा सुवर्णकाळ

तंजावरमध्ये फुललेला मराठी संस्कृतीचा सुवर्णकाळ

लात्मक अभिव्यक्तीचा सुवर्णकाळदक्षिण भारतातील तंजावर हे शहर केवळ भव्य बृहदेश्वर मंदिरामुळेच नव्हे, तर मराठी संस्कृतीच्या अद्भुत ठशांमुळेही इतिहासात विशेष स्थान मिळवते. मराठा राजवटीच्या काळात येथे कला, शिक्षण, संशोधन, साहित्य आणि सामाजिक प्रगती यांचा विलक्षण संगम घडला.

विशेषतः सरफोजी राजांच्या दूरदृष्टीमुळे तंजावरमध्ये ज्ञान, संस्कृती आणि कलात्मक अभिव्यक्तीचा जणू सुवर्णकाळच अवतरला. त्यांच्या कार्यामुळे तंजावर ही केवळ राजकीय राजधानी न राहता विद्या, संशोधन आणि संस्कृतीची समृद्ध भूमी बनली.

ॲड विलास पाटणे

सरफरोजी राजे यांची तंजावरमधील कारकीर्द मराठी प्रभावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरते. तंजावरचे राज्य विजयालय चोळ याने नवव्या शतकात जिंकून तेथे राजधानी वसवली. चोळ राजवंशाने तेथे सुमारे चारशे वर्षे राज्य केले. त्यानंतर विजयनगर राज्यातील शिवप्पा नायक याने तंजावर येथे स्वतंत्र राज्य स्थापले. ते राज्य 1673 पर्यंत नांदले. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी भोसले यांनी तेथे 1674 मध्ये सत्ता स्थापन केली. भोसले यांचे तंजावरमधील राज्य 1855 पर्यंत होते. नंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले.

दुसरे सरफोजी यांना तंजावरचे तुळाजी राजे भोसले यांनी 23 जानेवारी 1787 रोजी दत्तक घेतले. त्यांचा कार्यकाळ 1798 ते 1832 इतका राहिला. त्यांची कारकीर्द तंजावर राजवटीची शान उंचावणारी आहे. त्यांची ओळख जनतेचा राजा म्हणून अधोरेखित केली जाते. तुळाजी महाराजांचा मृत्यूनंतर सरफोजी राजांची जबाबदारी अमरसिंग यांच्यावर सोपवण्यात आली होती. पण त्यांनीच राजगादी बळकावली !

दरम्यान रेव्हरंड फ्रेडरिक स्कॉर्टझ यांनी हस्तक्षेप करून सरफोजीराजांना चेन्नईला शिक्षणासाठी पाठवले. सरफोजी राजे तमिळ, तेलगू, उर्दू, संस्कृत, फ्रेंच, जर्मन,स्पॅनिश, ग्रीक, डच आणि लॅटिन अशा भाषांत पारंगत झाले. महाराजांनी भव्य चर्च तंजावरच्या मध्यवर्ती भागात बांधून त्यांच्या स्मृती जपल्या आहेत. सरफोजी यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ब्रिटिशांनी तंजावरच्या कारभारात हस्तक्षेप करून सरफोजी यांना 29 जून 1798 रोजी राज्यावर बसवले.

सरफोजी महाराज यांची कारकीर्द विविध कारणांमुळे लक्षणीय ठरली आहे. राजानी धर्म, अर्थ , कला , संग्रहविद्या असे विविध स्तरावर अतुलनीय कामे केली. त्यांनी दक्षिण भारतातील पहिला देवनागरी छापखाना १८०५ मध्ये उभारला. त्यांनी दगडी छापखान्याचे नाव विद्याकलानिधी वर्ण यंत्रशाळा असे ठेवले होते. सरफोजी राजांनी तंजावूरच्या राजवाडा परिसरात तमिळनाडूमधील पहिले प्राणिसंग्रहालय निर्माण केले. त्यांनी तंजावरपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर गोदी बांधली. त्यांनी हवामान वेधशाळा उभी केली होती.

सरस्वती महाल हे तंजावरच्या राजमहालातील ग्रंथालय 'नायक राजवटीत, १५३५ -१६७३ या काळात उभारले गेले. सरफोजीराजांनी या ग्रंथालयात दुर्मिळ ग्रंथ, नकाशे, शब्दार्थकोष, नाणी, कलाकृती संग्रहित केल्या. त्यांनी अनुरुद्रै, त्यागराज अय्यर, पुदुकोरै आणि नारायण पिलै यांना पुस्तके व हस्तलिखिते मिळवण्यासाठी देशभरच्या भागांत पाठवले आणि कित्येक पुस्तके व हस्तलिखिते संग्रही जमा केले. त्यांनी चार हजारांपेक्षा अधिक पुस्तके जगातील विविध देशांतून खरेदी करून ती ग्रंथालयात आणून ठेवली. ग्रंथालयात वेदांत, व्याकरण, संगीत, नृत्य आणि नाटक, शिल्पशास्त्र, खगोलशास्त्र, वैद्यक अशा विविध विषयांवरील ग्रंथसंपदा आहे. महाराजांनी स्वतः ग्रंथालयांतील सर्व पुस्तकांवर इंग्रजीमध्ये सह्या केलेल्या आढळतात. मराठी दरबारातील कामकाजाच्या मोडी लिपीत केलेल्या नोंदी तेथे उपलब्ध आहेत. फ्रेंच व मराठी भाषांतील पत्रव्यवहारही जतन करण्यात आला आहे. एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाया या प्रसिद्ध इंग्रजी विश्वकोशाने सरस्वती ग्रंथालयांची सर्वेक्षणात भारतातील ते सर्वांत मोठे ग्रंथालय अशी नोंद केली आहे.

सरफोजी महाराजांनी माणसे व प्राणी यांच्यासाठी एतद्देशीय वनस्पतीजन्य औषधनिर्मिती आणि संशोधन यासाठी 'धन्वंतरी महाल' या संशोधन संस्थेची स्थापना केली. त्या ठिकाणी आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि आधुनिक औषधे अशा चारही उपचारशाखांवर संशोधन केले जात असे. तेथे वनस्पती आणि त्यांचे औषधी उपयोग यांवर अठरा भागांत संशोधनपर ग्रंथ उपलब्ध आहेत. राजांकडे महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची रंगीत हस्तचित्रे होती.

त्यांनी धन्वंतरी महालाच्या औषधोपचार पद्धतीचे तपशीलवार वर्णन करणारा एक कवितासंग्रह तयार केला होता. त्या कविता सभेंद्र वैद्य मेरैगल यांनी एकत्रित केल्या होत्या. राजांनी आपल्यात हस्ताक्षरात नोंदी औषधींवरील ग्रंथांत इंग्रजीत केलेल्या आढळून येतात. सरफोजी राजे त्यांच्या बरोबर शल्य-चिकित्सेची सामग्री नेहमी बाळगत. ते जेथे जात तेथे मोतिबिंदूच्याशस्त्रक्रिया करत. सरफोजी यांनी केलेल्या शस्त्रक्रियांच्या नोंदी इंग्रजीत तपशीलवार सापडतात . त्या सरस्वती महाल ग्रंथालयाच्या संग्रहात आहे.

महाराजांनी नवविद्याकला विधी शाळेची स्थापना केली. तेथे भाषा, साहित्य, कला, कौशल्य यांशिवाय; वेद आणि शास्त्र यांचे शिक्षण दिले जात असे. महाराजांचे तरंगमबाडीशी घट्ट संबध होते (तरंगमबाडी म्हणजे गाणाऱ्या जललहरींचा प्रदेश ). त्यांनी तेथील शाळांना भेटी देऊन ती शिक्षणपद्धत त्यांच्या राज्यात लागू केली. त्यांनी स्त्रियांची शिक्षक म्हणून नेमणूक करून शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांनी पाण्याचे दहा तलाव बांधले, कित्येक विहिरी खोदल्या .

सरफोजीयांनी नवीन मंदिरे बांधलीच; बृहदेश्वराच्या मंदिराचा जसा जीर्णोध्दार केला. तसेच इतर पुरातन मंदिरांचाही जीर्णोध्दार केला. किल्ल्यातील मनोरा; तसेच, तंजावूर राजवाड्यातील पाच मजले असलेली सरजा माडी ही सरफोजी यांच्या काळातच बांधली गेली. ती वास्तू - तिचा वीज पडण्यापासून बचाव व्हावा यासाठी तिच्यावर धातूचे खांब बसवलेआहेत. त्यांनी भोसले घराण्याचा इतिहास बृहदेश्वर मंदिराच्या नैऋत्य दिशेच्या भिंतीवर दगडांत कोरून घेतलाआहे. ते जगातील सर्वात दीर्घ असे शिलालेखन आहे. सरफोजी 1820-21 मध्ये यात्रेसाठी निघाले तेव्हा त्यांच्या बरोबर सुमारे तीन हजार यात्रेकरू अनुयायी होते. त्यांनी पुष्कळ ठिकाणी तंबू ठोकून वस्ती केली आणि गरिबांना दान दिले. त्यांनी कित्येक धर्मशाळा रामेश्वरम ते वाराणसी या मार्गावर यात्रेकरूंसाठी बांधल्या आहेत. त्यांची रंगचित्रे गंगेच्या घाटावर; तसेच, अन्य पवित्र स्थानांवर त्यांच्या अभिरूचीसंपन्न जीवनाची साक्ष देत आहेत. सरफोजी राजे मोकळया मनाचे होते. ते अन्य धर्मपंथीय श्रद्धावंताच्या बाबतीत सहिष्णू होते. त्यांनी ख्रिश्चन मिशनरीनी चालवलेल्या शाळा आणि चर्चेस यांना देणग्या दिल्या.

त्यांचा मृत्यू चाळीस वर्षांच्या कारकिर्दीनंतर 7 मार्च 1832 रोजी झाला. त्यांच्या अंत्ययात्रेस सुमारे नव्वद हजार लोक उपस्थित होते. तेरा मराठा राजांनी एकशेऐंशी वर्षे तंजावूरवर राज्य केले. तंजावरमध्ये मराठी भाषा आणि संस्कृती गेली चारशे वर्षे समृद्ध अस्तित्व राजांनी टिकवून ठेवले आहे .
मराठ्यांचं तंजावरमधलं आगमन हे केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हतं तर तमिळ आणि मराठी संस्कृतीच्या एकत्रित संवर्धनाचा शुभारंभ होता .त्यांच्यासोबत मराठी सरदार, सैनिक, पंडित, कलाकार आले . तंजावरमधील त्यांच्या येण्याने आणि सौहार्दपणे व्यवहाराने सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू झाली. यामधून तंजावरची सामाजिक आणि सांस्कृतिक वीण समृद्ध झाली.

तंजावरच्या मराठ्यांनी महाराष्ट्राशी सांस्कृतिक संबंधातून नाळ, आणि भूमीशी असलेली वचनबद्धता दिसते. मराठा शैलीतील स्थापत्य तंजावरचे खास वैशिष्ट्य आहे. बृहदेश्वर संकुलातील गणेश मंदिर, विजयराम मंदिर ही यातील काही उल्लेखनीय कामं. समावेशकतेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न पाहताना मराठ्यांचा प्रगतिशील दृष्टिकोन अधोरेखित होतो. तंजावरच्या हा काळ कलात्मक अभिव्यक्तीचा सुवर्णकाळ होता. तंजावरच्या मराठा राजांनी कर्नाटक संगीताला देखील आश्रय दिला. कालांतराने हे बंध कमकुवत झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसांना दक्षिणेतील त्यांच्या विस्तारित मराठा नात्याची माहिती धूसर झाली आहे. ही दरी भरून काढून मराठा समुदायाच्या या नात्याला जिवंत करण्याचे काम या पुस्तकाने केले आहे.

मराठी संस्कृतीच्या भविष्यासाठी पायाभरणी चार शतकांहून अधिक काळ, तंजावर एक अद्वितीय आणि चैतन्यशील मराठी वारसा आहे. तंजावरच्या मराठी राजवंशाचे तेरावे वंशज म्हणून, सफजीराजे यांच्या असाधारण वारशाला समर्पित करण्यात अॅड. विलास पाटणे यांचे मराठीतील हे महत्वाचे पहिले पुस्तक रसिक वाचकांच्या हाती देताना आनंद होत आहे. हे पुस्तक मराठ्यांच्या तंजावरच्या सुवर्णकाळावर प्रकाश टाकते. मराठ्यांचे तंजावर मधील आगमन हे केवळ सत्तेचे हस्तांतरण नव्हे तर तमिळ आणि मराठी परंपरांच्या संमेलनाचे, त्यांच्या एकत्रित संवर्धनाची सुरुवात होती. यामधून तंजावरची सामाजिक आणि आध्यात्मिक वीण समृद्ध झाली. मराठ्यांच्या काळात, तंजावरमध्ये कलात्मक अभिव्यक्तीचा सुवर्णकाळ होता. अॅड. विलास पाटणे यांनी यावर सखोल संशोधन करून आणि उत्कृष्ठ मांडणी केली आहे. हे पुस्तक केवळ सर्फीजीराजांचा सन्मान करत नाही तर दक्षिणेतील विस्तारित मराठा वंशाशी महाराष्ट्राला पुन्हा जोडणारा पूल म्हणूनही काम करते. हे पुस्तक दोन्ही प्रदेशांतील संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देईल. या चरित्र ग्रंथाचे लेखक वकील आहेत. त्यांनी सफजीराजांचे चरित्राचा साक्षेपी वृत्तीने वेध घेतला आहे. तंजावरच्या मराठा राजवटीतील घडामोडींचा धांडोळा अॅड. पाटणे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सुंदर घेतला आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनता आणि महाराष्ट्र सरकार यांचे परस्पर संवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे मार्ग नव्याने सुरु होईल. या प्रेरणादायी ग्रंथाने मराठी संस्कृतीच्या उज्वल भविष्यासाठी पायाभरणी ठरेल. बाबाजीराजे भोसले, तंजावर

पुस्तकाचे नाव - श्रीमंत सरफोजीराजे भोसले तंजावर
लेखक - विलास पाटणे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari