Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अशोकराव चव्हाणांच्या खंद्या समर्थकाचे नाव चर्चेत; 'निष्ठावंतांना' पुन्हा डावलणार?

अशोकराव चव्हाणांच्या खंद्या समर्थकाचे नाव चर्चेत; 'निष्ठावंतांना' पुन्हा डावलणार?

नांदेड : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या आगामी विधानपरिषद निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले असून, नांदेडच्या जागेवरून राजकीय घडामोडींना कमालीची गती आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे अत्यंत खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अमरनाथ राजूरकर यांचे नाव या जागेसाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

मात्र, या संभाव्य उमेदवारीमुळे पक्षासाठी वर्षांनुवर्षे जमिनीवर काम करणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या ‘निष्ठावंत’ कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे.

अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेडच्या स्थानिक राजकारणाची गणिते पूर्णपणे बदलली आहेत. चव्हाण यांच्यासोबत त्यांचे अनेक खंदे समर्थकही भाजपवासी झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोकराव चव्हाण आपल्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्याला म्हणजेच अमरनाथ राजूरकर यांना विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी आग्रही आहेत. राजूरकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून, वरिष्ठ पातळीवरही त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. चव्हाण यांच्या राजकीय वजनामुळे त्यांच्या समर्थकाला ही मोठी लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे.

कार्यकर्त्यांचा सूर: एकीकडे चव्हाण समर्थकांच्या गोटात उत्साहाचे वातावरण असताना, दुसरीकडे पक्षातील जुन्या आणि मूळ कार्यकर्त्यांमध्ये मात्र यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पक्षाने सत्तेत नसताना ज्यांनी दिवस-रात्र घाम गाळला, आंदोलने केली आणि पक्ष वाढवला, त्यांना डावलून ऐनवेळी पक्षात आलेल्यांना किंवा केवळ नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींना पदे दिली जात आहेत, अशी भावना निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. “वर्षांनुवर्षे पक्षाची झीज सोसणाऱ्या प्रामाणिक चेहऱ्यांचा विचार कधी होणार? दरवेळी निवडणुकीच्या तोंडावर निष्ठावंतांना केवळ ‘सतरंज्या उचलण्यासाठी’ वापरले जाते आणि महत्त्वाची पदे आयात केलेल्या नेत्यांच्या पदरात पाडली जातात,” असा संतप्त सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.

The post अशोकराव चव्हाणांच्या खंद्या समर्थकाचे नाव चर्चेत; ‘निष्ठावंतांना’ पुन्हा डावलणार? appeared first on Lokmanthan | लोकमंथन.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan