Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यात उद्या 'कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलनकेंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी

पुण्यात उद्या 'कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलनकेंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी

पुणे : दिल्लीतील आंदोलनानंतर आता 'कॉकरोच जनता पक्ष'ाने महाराष्ट्रातही आंदोलनाची हाक दिली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी उद्या गुरूवारी 11 जून रोजी पुण्यात मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे.

या आंदोलनामागे स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमिततांविरोधातील नाराजी हे प्रमुख कारण असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. विविध प्रवेश परीक्षा, शैक्षणिक निकालांबाबत निर्माण झालेले वाद आणि भरती प्रक्रियेतील कथित त्रुटींमुळे विद्यार्थी व युवकांमध्ये असंतोष वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर संबंधित घडामोडींची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी पद सोडावे, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. यापूर्वी 6 जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे या पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात विद्यार्थी, युवक आणि पालकांनी सहभाग नोंदवला होता. आंदोलनादरम्यान शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या आंदोलनानंतर देशभरात या चळवळीची चर्चा सुरू झाली. 'कॉकरोच जनता पक्ष' ही संकल्पना सुरुवातीला सामाजिक माध्यमांवरील व्यंगात्मक मोहिमेच्या स्वरूपात समोर आली होती. बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील अडचणी आणि युवकांच्या वाढत्या नाराजीला अभिव्यक्ती देण्यासाठी ही चळवळ उभी केल्याचा दावा संस्थापकांकडून करण्यात येतो. अल्पावधीतच या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील हे पहिले मोठे आंदोलन मानले जात असून विद्यार्थी आणि युवकांचा व्यापक सहभाग मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, सामाजिक माध्यमांतून सुरू झालेली ही चळवळ आता राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे. युवकांमधील असंतोषाचे प्रतीक म्हणून या आंदोलनाकडे पाहिले जात असल्याचे काही राजकीय जाणकारांचे मत आहे. पुण्यातील आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि त्याचे पुढील राजकीय परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan