शेवगाव: नीट पेपरफुटी प्रकरण, शिक्षण क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शेवगावकरांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ तसेच दिल्ली संसद मार्चला समर्थन देण्यासाठी शेवगाव शहरातील क्रांती चौकात लोकशाहीवादी पक्ष व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सरकारविरोधी घोषणा दिल्या. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेल्या खेळाविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच शिक्षण व्यवस्थेत पूर्ण पारदर्शकता आणून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका अध्यक्ष ॲड. अविनाश मगरे, एआयएसएफचे वैभव शिंदे, प्रा. मफीज इनामदार, कॉ. संदीप इथापे, प्यारेलाल शेख, शिवाजी मडके, अजिंक्य लव्हाट, कानिफ कर्डिले, दत्तात्रय आरे, बबनराव पवार, गोरख भापकर, ॲड. गणेश ताठे, ॲड. अभिषेक चौधरी, ॲड. रजत लांडे, ॲड. हिरामण म्हस्के, ॲड. अतुल लबडे, ॲड. अफरोज शेख, ॲड. सुहास चव्हाण, ॲड. नामदेव गरड, किसान सभेचे बापूराव राशिनकर, विष्णू गोरे यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचे तातडीने संरक्षण करावे, नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी तसेच शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध गावांतून दिल्लीतील या आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत असून अनेक ठिकाणी पाठिंब्याची निवेदनेही देण्यात येत आहेत.
The post शिक्षणातील भ्रष्टाचाराविरोधात शेवगावमध्ये रास्तारोको; दिल्लीतील आंदोलनास नागरिकांचा जाहीर पाठिंबा appeared first on Lokmanthan | लोकमंथन.

