Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
श्रीगोंदा-कर्जतमध्ये मुसळधार पाऊस शेती, फळबागा, घरांचे नुकसान

श्रीगोंदा-कर्जतमध्ये मुसळधार पाऊस शेती, फळबागा, घरांचे नुकसान

श्रीगोंदा/कर्जत : श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले असून शेती, फळबागा, सोलर यंत्रणा तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

श्रीगोंद्यात 29.4 मिलीमिटर पाऊस झाला.
अचानक आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही भागात विजेच्या खांबांनाही फटका बसल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला. शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके, फळबागा तसेच सोलर पंप आणि इतर कृषी यंत्रणांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आधिच संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्ये श्रीगोंदा 104, आढळगाव 84.3, भानगाव 70.2, पेडगाव 61.5, काष्टी 57.6, मांडवगण 56.1, कोळगाव 53.5, बेलवंडी 22.3, चिंबळा 21.8, लोणी व्यंकनाथ 16.3 आणि दिवदैठण 11.8 टक्के पावसाची नोंद झाली असल्याची माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी जंजीरे यांनी दिली.
सोमवारी सायंकाळी श्रीगोंद्याबरोबरच कर्जतलाही पावसाने चांगलेच झोडपले. कर्जतला 38.6 मिलीमिटर पाऊस झाला. झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला असून आता खरीपाच्या पेरणीला वेग येणार आहे.
दरम्यान, जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून गोवानंतर तिथून पुढे महाराष्ट्रातील तळकोकणात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये धडकला. मात्र अद्यापही राज्याच्या कानाकोपऱ्यात नैऋत्य मौसमी वारे पोचले नसल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मान्सूनच्या आगमनाकडे नागरिकांचे लक्ष लागले असून येत्या दोन दिवसांत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अल निनो सारख्या महाभयंकर संकटामुळे मान्सूनची प्रगती मंदावली असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं. सध्याचा पाऊस बिगर मोसमी असून शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करण्याचे टाळावे, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan