रामभाऊ जगतापबारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त माळेगाव-बारामती मार्गावर नागरिकांसाठी एकदिवसीय मोफत रिक्षा प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

माळेगाव शारदानगर येथील काळे परिवाराच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला असून नागरिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

माळेगाव येथील रिक्षा तळावरील सर्व रिक्षाचालकांना दिवसभराच्या भाड्याची रक्कम विराज दत्तात्रय काळे यांच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे माळेगाव ते बारामती आणि बारामती ते माळेगाव या मार्गावर नागरिकांना दिवसभर विनामूल्य प्रवास करता आला.
महिलांसाठी मोफत बस प्रवासाची योजना ही अजितदादा पवार यांच्या महत्त्वाकांक्षी निर्णयांपैकी एक होती.

त्याच संकल्पनेला अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे विराज काळे यांनी सांगितले.विशेष म्हणजे, काळे परिवारातील सामाजिक कार्यकर्ते स्व. सुरेश एकनाथ काळे यांच्या स्मृतिदिनाचेही औचित्य साधून ही सेवा सुरू करण्यात आली.

या उपक्रमासाठी दहाहून अधिक रिक्षा दिवसभर प्रवाशांच्या सेवेत कार्यरत असून, सुमारे एक हजारांहून अधिक नागरिक या मोफत प्रवासाचा लाभ घेतील, असा विश्वास विराज काळे यांनी व्यक्त केला.


