बारामती तालुक्यातील खांडज परिसरात गेल्या दोन-अडीच वर्षांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. सुरुवातीला हा प्रश्न केवळ शेतकऱ्यांच्या शेळ्या-मेंढ्यांपुरता मर्यादित असल्याचे मानले गेले.
पण आज परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, बिबट्या थेट घरांच्या अंगणात, बंगल्यांच्या मागे आणि वस्तीच्या अगदी जवळ दिसू लागला आहे. हा केवळ वन्यप्राण्यांचा प्रश्न राहिलेला नाही, तर तो आता नागरिकांच्या जीविताशी संबंधित गंभीर सुरक्षा प्रश्न बनला आहे.
काल पुन्हा खांडज येथील २२ फाटा आटोळे वस्तीवर भाऊ पाटील आटोळे यांच्या बंगल्याच्या मागे बिबट्या दिसला. संग्राम आटोळे यांनी आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार कैद केला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ग्रामस्थांच्या भीतीत आणखी भर पडली आहे. कारण हा एखादा अपवाद नाही, तर गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने घडणाऱ्या घटनांची ही आणखी एक नोंद आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात नर, मादी आणि त्यांचे पिल्लू असे किमान तीन बिबटे वावरत असल्याचा संशय आहे. अनेक शेळ्या फस्त झाल्या, जनावरांवर हल्ले झाले, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले; तरीही वनविभागाकडून ठोस कारवाई झाल्याचे चित्र दिसत नाही. पिंजरे लावून झाले, पण गस्त वाढवणे किंवा प्रभावी उपाययोजना करण्याऐवजी केवळ पाहणी आणि आश्वासनांवर वेळ घालवला जात असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.
प्रश्न असा आहे की, प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? बिबट्याचा वावर आता दिवसाढवळ्या होत आहे. शेतात काम करणारे शेतकरी, मजूर, शाळेत जाणारी मुले, पाणी भरणाऱ्या महिला आणि सकाळ-संध्याकाळ फिरणारे ज्येष्ठ नागरिक यांच्यावर कायम भीतीचे सावट आहे. एखाद्या दिवशी जर मनुष्यावर हल्ला झाला, तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार?
ग्रामस्थांनी आपल्या व्यथा प्रांताधिकारी कार्यालयात मांडल्या. वनपरिक्षेत्र कार्यालयात जाऊन निवेदन दिले. अनेकदा तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आता ग्रामस्थांचा संयम संपत चालला आहे. वनखात्याला सात दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत ठोस कारवाई झाली नाही, तर बारामती-फलटण मार्ग रोखून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, या सात दिवसांत एखाद्या नागरिकाच्या जीवितास धोका झाला किंवा बिबट्याच्या हल्ल्यात कोणाचा बळी गेला, तर संबंधित वनअधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ही मागणी किती कायदेशीर ठरेल, हा वेगळा विषय असला तरी, त्यामागील संताप आणि असुरक्षिततेची भावना प्रशासनाने गांभीर्याने घेतली पाहिजे.
वन्यजीवांचे संरक्षण महत्त्वाचेच आहे. पण त्याचबरोबर माणसाच्या जीविताचे रक्षण हीसुद्धा शासनाची तितकीच मोठी जबाबदारी आहे. वेळेवर उपाययोजना केल्या, तर माणूस आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळता येऊ शकतो. मात्र प्रत्येक वेळी एखादी दुर्घटना घडल्यानंतरच यंत्रणा जागी होणार असेल, तर तो प्रशासनाचा मोठा अपयश ठरेल.
खांडजमधील नागरिकांना आश्वासनांची नव्हे, तर तातडीच्या आणि प्रभावी कारवाईची गरज आहे. कारण बिबट्या आता जंगलात नाही… तो थेट माणसांच्या दारात पोहोचला आहे. आणि प्रशासनाने अजूनही डोळेझाक केली, तर पुढची बातमी ही केवळ बिबट्या दिसल्याची नसेल, तर एखाद्या निष्पाप जीवाच्या मृत्यूची असू शकते.

