Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बारामतीतील गुन्हेगारी, पाणीटंचाई, पक्षाचे विलीनीकरण युगेंद्र पवार काय म्हणाले?

बारामतीतील गुन्हेगारी, पाणीटंचाई, पक्षाचे विलीनीकरण युगेंद्र पवार काय म्हणाले?

विक्रम वरे : महान्यूज लाईव्हबारामती : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी रविवारी बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेत पक्ष संघटन, आगामी राजकारण, २०२९ ची निवडणूक तसेच पक्ष विलीनीकरणाच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली.

"विलीनीकरण आता होणार नाही" असे स्पष्ट सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.

युगेंद्र पवार म्हणाले की, काही दिवसांपूर्वी वाय बी सेंटर येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. त्या वेळी लवकरात लवकर संघटनात्मक नियुक्त्या पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार पक्षाने काम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

२०२९ च्या निवडणुकीत "पवार विरुद्ध पवार" अशी लढत होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना युगेंद्र पवार यांनी सावध भूमिका घेतली. "राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. २०२९ ला अजून तीन वर्षांचा कालावधी बाकी आहे. एका वर्षातही अनेक राजकीय समीकरणे बदलतात. त्यामुळे २०२८ मध्ये मला हा प्रश्न विचारला तर अधिक स्पष्ट सांगू शकेन," असे ते म्हणाले. त्यामुळे आगामी निवडणुकांबाबत त्यांनी कोणतीही ठाम भूमिका जाहीर करण्याचे टाळले.

पक्षात पद न मिळाल्याबाबत बोलताना त्यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. "ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांनाही मोठी पदे मिळाली. कदाचित माझ्याच अपेक्षा चुकीच्या असतील,"असे सांगत त्यांनी सूचक वक्तव्य केले.मात्र त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत,"मला पद मिळाले नाही हेच माझ्या फायद्याचे ठरले.त्यामुळे मला लोकांमध्ये अधिक वेळ देता आला. काही लोक पद घेतात पण त्या पदाला न्याय देत नाहीत."असेही पवार यांनी नमूद केले.

तालुक्यासह राज्यातील परिस्थितीवर भाष्य करताना युगेंद्र पवार यांनी सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. "आज महाराष्ट्रातील अनेक नागरिक नाराज आहेत. कांद्याला योग्य दर मिळत नाही, लोडशेडिंग सुरू आहे, अनेक भागांत पाण्याची टंचाई आहे. बारामतीमध्येही गुन्हेगारी वाढत चालली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे," असे ते म्हणाले. सत्ता नसतानाही लोकांची कामे करत राहिलो, तर नागरिक निश्चितपणे आपल्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. "विलीनीकरणाबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. मात्र आता विलीनीकरण होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट केली असून तो संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक होते,"असे त्यांनी सांगितले.

विलीनीकरण झाले असते तर त्याचा स्वतःला फटका बसला असता का, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केला. "जर विलीनीकरण झाले असते आणि आम्ही अजित दादांसोबत गेलो असतो,तर शरद पवार साहेब आणि अजित दादा दोघेही माझी शंभर टक्के काळजी घेतली असते, याची मला खात्री आहे,"असे युगेंद्र पवार म्हणाले.

या पत्रकार परिषदेमुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून,आगामी काळात युगेंद्र पवार यांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live