Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गावठाण फिडरसाठी उंडवडी सुपे ग्रामस्थांचे आंदोलन; वीज उपकेंद्र बंद

गावठाण फिडरसाठी उंडवडी सुपे ग्रामस्थांचे आंदोलन; वीज उपकेंद्र बंद

उंडवडी : महान्यूज लाईव्ह

उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील वारंवार होत असलेल्या भारनियमनाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी सोमवारी रात्री महावितरणच्या वीज उपकेंद्रावर धरणे आंदोलन करत उपकेंद्र बंद पाडले.

या आंदोलनामुळे उंडवडी सुपेसह परिसरातील अनेक गावांचा वीज पुरवठा रात्रभर खंडित राहिल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली.

सोमवारी (ता. २५) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थ, शेतकरी आणि युवक मोठ्या संख्येने वीज उपकेंद्रावर जमा झाले. "जोपर्यंत उंडवडी सुपे गावठाण फिडर स्वतंत्र केला जात नाही, तोपर्यंत उपकेंद्र सुरू होऊ देणार नाही," अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. हे आंदोलन पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होते.

आंदोलनादरम्यान उपकेंद्रातील ऑपरेटरला उपकेंद्र बंद करण्यास भाग पाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उंडवडी सुपे, कारखेल, खराडेवाडी, साबळेवाडी, उंडवडी क. प., बऱ्हाणपूर आणि सोनवडी सुपे या परिसरातील गावांचा वीज पुरवठा रात्री ११ वाजल्यापासून मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत बंद होता. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

विशेष म्हणजे आंदोलन सुरू असताना महावितरणचा एकही वरिष्ठ अधिकारी उपकेंद्रावर उपस्थित नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. उंडवडी सुपे येथे गावठाण फिडर अद्याप स्वतंत्र करण्यात आलेला नसल्याने दररोज रात्री ६ ते १० या वेळेत भारनियमन केले जात आहे. परिणामी उकाडा, पाणीपुरवठा तसेच दैनंदिन कामांमध्ये नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

उंडवडी सुपेसह परिसरातील गावांना वीजपुरवठा करणारे महावितरणचे उपकेंद्र उंडवडी सुपे गावाच्या हद्दीतच आहे. मात्र, उपकेंद्र ज्या गावात आहे त्याच गावठाणावर भारनियमन होत असल्याने "दिव्याखाली अंधार" अशी परिस्थिती निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, महावितरणने स्मार्ट मीटर योजना जिल्ह्यात सर्वप्रथम उंडवडी सुपे येथे राबविली. त्यामुळे "स्मार्ट मीटरसाठी गावाची निवड होते, मग गावठाण फिडर स्वतंत्र करून भारनियमनमुक्त योजना का राबविली जात नाही?" असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, सोनवडी सुपे, कारखेल, उंडवडी क. प., जराडवाडी आणि खराडेवाडी येथील गावठाण फिडर स्वतंत्र करण्यात आल्याने त्या गावांतील मुख्य वस्तीवरील भारनियमन बंद झाले आहे. मात्र, वाड्या-वस्त्यांवर अद्यापही भारनियमन सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

याबाबत वीजतंत्रज्ञ किशोर मस्तूद म्हणाले, "महावितरणकडून गावठाण फिडरचे काम गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी वीजेचे खांब उभारण्यास तसेच वीजरोहित्र बसविण्यास स्थानिकांचा विरोध होत आहे. एका बाजूला वीज द्या अशी मागणी केली जाते, तर दुसऱ्या बाजूला खांब आमच्या दारात किंवा जागेत नको अशी भूमिका घेतली जाते. त्यामुळे कामात अडथळे निर्माण होत आहेत."

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live