सुपे पोलीस ठाण्याच्या प्रस्तावावर ग्रामीण पोलीस अधीक्षकांचा कडक निर्णय; दोन जिल्ह्यांतून २४ महिने बंदी
सचिन पवार, सुपे : बारामती तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारी कारवायांना वेसण घालण्यासाठी सुपे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये हद्दपारीची मोठी कारवाई करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, या चौघांना २४ महिन्यांसाठी (दोन वर्षे) सीमापार करण्यात आले आहे.
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये वैभव तुकाराम शेलार (वय ३२, रा. मगरवाडी), किरण मारुती गायकवाड (वय २५, रा. मगरवाडी), अनिकेत प्रदीप काळे (वय २८, रा. करंजे) आणि अमोल पोपट गायकवाड (वय ३४, रा. गायकवाडवस्ती, मगरवाडी) यांचा समावेश आहे. सुपे पोलीस ठाण्याने या चौघांविरुद्ध दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी तपासून हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता. गुन्हेगारी अभिलेख आणि सुनावणीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
या आदेशानुसार संबंधितांना पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर व हवेली हे तालुके, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच लगतच्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या हद्दीतून पुढील दोन वर्षांसाठी निष्कासित करण्यात आले आहे. आदेशाचा भंग करून या क्षेत्रात प्रवेश केल्यास संबंधितांवर तात्काळ अटक करून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सक्त इशारा ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.

