Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जेजुरीहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला भीषण अपघात; तिघांची प्रकृती चिंताजनक

जेजुरीहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला भीषण अपघात; तिघांची प्रकृती चिंताजनक

दौलतराव पिसाळ, वाईसातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सुरूर (ता. वाई) गावच्या हद्दीत रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. जेजुरी येथे खंडोबाचे दर्शन घेऊन सांगली जिल्ह्यातील विटा परिसराकडे परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरो गाडीने महामार्गावरील डिव्हायडरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

या दुर्घटनेत २ ते ३ जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

ही घटना ७ जून २०२६ रोजी सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास सुरूर येथील हॉटेल साई पार्क इन समोर घडली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की बोलेरो वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
प्राथमिक माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथील संदीप संपत शिरतोडे, राजापूर (बोरगाव) येथील महादेव मोहन मदने यांच्यासह त्यांचे नातेवाईक असे एकूण ८ ते १० जण बोलेरोमधून जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते.

दर्शन आटोपून सर्वजण गावी परतत असताना सुरूर गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बोलेरो थेट महामार्गावरील डिव्हायडरवर जाऊन आदळली. अपघात होताच घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक, महामार्ग पोलीस आणि मदत पथकांनी तातडीने धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले. जखमींना प्रथम कवठे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी २ ते ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास भुईंज पोलीस करत आहेत. या दुर्घटनेमुळे भाविकांच्या आनंदी प्रवासाला दुःखाची किनार लाभली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live