दौलतराव पिसाळ, वाई
सुरूर गाव तसेच धावजी पाटील मंदिर परिसरात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण केल्याप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी त्याला भुईंज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मकश्या काळे (रा. पारधी वस्ती, सुरूर, ता. वाई, जि. सातारा) याच्याविरोधात यापूर्वी गंभीर गुन्ह्यांची नोंद असून तो एका खूनप्रकरणातील (कलम 302) आरोपी आहे. सध्या तो जामिनावर बाहेर आला होता. गेल्या काही दिवसांपासून सुरूर गाव तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धावजी पाटील मंदिर परिसरात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी भुईंज पोलिस ठाण्यात केली होती.
या तक्रारीची माहिती सातारा एलसीबीचे पोलिस निरीक्षक घोडके यांना मिळाल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव यादव यांच्या नेतृत्वाखाली हवालदार शैलेश फडतरे, जगदने, सुजीत भोसले, अमित माने, ओंकार यादव, सचिन ससाणे, रोहित निकम आणि विशाल पवार यांचा समावेश असलेल्या पथकाने तपास सुरू केला.
गुरुवारी सकाळी बनवडी (ता. कोरेगाव) येथील चंदन-वंदन डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पारधी वस्ती परिसरात सापळा रचून पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला भुईंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

