Dailyhunt
वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

दौलतराव पिसाळ, वाई

वाईत राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून, विराज शिंदे यांच्या भाजपसोबतच्या हातमिळवणीच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

'गद्दारी'चा आरोप करत सोमवारी शहरात काढण्यात आलेल्या विराट निषेध मोर्चामुळे वाई शहर घोषणांनी दणाणून गेले.

महागणपती घाटावरून सकाळी अकराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. महात्मा फुले मंडई, धर्मपुरी पेठ मार्गे विराज शिंदे यांच्या 'विराज गॅस एजन्सी'समोरून हा मोर्चा पुढे सरकत मुख्य किसन वीर चौकात पोहोचला. शिंदे यांच्या घरासमोर थांबून कार्यकर्त्यांनी आक्रमक घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला.

मोर्चाच्या समारोपावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव मस्कर आणि अध्यक्ष मदनराव भोसले यांनी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. मतदारांच्या विश्वासाला तडा देत पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप त्यांनी केला. यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी विराज शिंदे यांचा प्रतीकात्मक पुतळा जोडे मारून जाळत निषेध नोंदवला.

या आंदोलनात वृषाली चव्हाण, बापूसाहेब शिंदे, वर्षा जगताप, दिलीप पिसाळ, सत्यजित वीर, निशा डाळवाले, शशिकांत पवार, मोहन जाधव, विनायक येवले, सनी चव्हाण, संतोष ननावरे, निलेश शिंदे, विलास मांढरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दरम्यान, संभाव्य तणाव लक्षात घेता पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. बावधन गटातील या राजकीय घडामोडींमुळे वाई तालुक्यातील राजकारण तापले असून, या कथित 'गद्दारी'चा हिशोब मतदार आगामी निवडणुकीत करतील, असा स्पष्ट इशारा मोर्चातून देण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live