Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोकुळमध्ये मोठा भाऊ, महायुतीचे गोडवे गाऊ

गोकुळमध्ये मोठा भाऊ, महायुतीचे गोडवे गाऊ

कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची महत्वाची आर्थिक जीवनवाहिणी असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक १८ ऑक्टोबर होत आहे. गेले सहा महिने निवडणूकीत मतदानाचा अधिकार कोणाला यावरुन महायुतीतील घटकपक्षातून सरकारी पातळीवर शह काटशहाचे राजकारण रंगले.

अखेर दूध संस्थांना हायकोर्ट, सुप्रिम कोर्टाचे दरवाजे ठोठवायला लागले. दूधसंस्थांना न्याय मिळाला. पण गोकुळमध्ये मोठा भाऊ कोण? यावरुन कलगीतुरा सुरू झाला आहे. निवडणुकीपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये फाटले असताना त्याला टाके घालण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या करावे लागणार आहे. हे टाके जोडले जाणार की तटातट तुटणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (The ‘Elder Brother’ slogan in Gokul)

सतीश घाटगे

मुश्रीफ, पाटील, कोरेनी सत्तांतर घडवले

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळची वार्षिक उलाढाल सव्वादोन हजार कोटी रुपयांवरुन अधिक आहे. प्रत्येक महिन्याच्या तीन, तेरा आणि तेवीस तारखेला दूध उत्पादकांना त्यांनी गोकुळला घातलेल्या दूधाचे पैसे मिळतात. त्यामुळे दुष्काळ असो वा अवकाळी अथवा करोना महामारीचे संकट असतानाही गोकुळमुळे ग्रामीण भागात जीवनमान स्थिरस्थावर असते. १९९० पासून तीन दशके गोकुळ दूध संघ माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली काम करत होता. महाडिक यांच्याकडून गोकुळ दूध संघ काढून घेण्याचे विरोधकांनी अनेक प्रयत्न केले पण त्याला यश येत नव्हते. पण मागच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ, सतेज पाटील, विनय कोरे, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर यांनी महादेवराव महाडिक, पी.एन.पाटील आणि अरुण नरके गटांवर विजय मिळवत गोकुळमध्ये सत्तांतर घडवले.

मुश्रीफांच्या मुलाला अध्यक्षपदाची लॉटरी

सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार पहिली चार वर्षे गोकुळचे अध्यक्षपद विश्वास नारायण पाटील आणि अरुण डोंगळे यांनी प्रत्येकी दोन वर्षे सांभाळले. शेवटच्या वर्षी अध्यक्षपद सतेज पाटील गटाला देण्याचे ठरले असताना राज्याच्या राजकारणात सत्तेत असलेल्या भाजप महायुतीचे सर्वोसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा अध्यक्ष झाला पाहिजे अशी भूमिका घेतली आणि लॉटरी लागली ती हसन मुश्रीफ यांना. मुश्रीफांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ अध्यक्ष झाले. पण पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी आपल्या गटाच्या दूध संस्थांची मोठी नोंदणी केली. त्यामध्ये मुश्रीफ, सतेज पाटील यांचे पारडे जड झाले.

गोकुळ निवडणुकीत अद्श्य शक्तीचे अडथळे

मे महिन्यात गोकुळची निवडणूक होण्याची शक्यता असताना अवसायनातील संस्थांना मुद्दा पुढे निघाला. पाच वर्षाच्या सत्तेत नवीन दूध संस्थांची नोंदणी करण्यासाठी मुश्रीफ, कोरे, आबिटकर, सतेज पाटील यांनी प्रयत्न केला होता. पण मुश्रीफांची ताकद गोकुळमध्ये वाढू नये यासाठी महायुतीत शह काटशहाचे राजकारण झाले. गोकुळवर प्रशासक राज्य आले. गोकुळची निवडणुका घ्या यासाठी महायुती आणि विरोधक मागणी करत होते पण सरकारमधील अद्श्य शक्ती त्यासाठी अडथळे आणत होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने १० ऑक्टोबरपर्यंत गोकुळची निवडणूक घेण्याचे आदेश दिले. गोकुळच्या राजकारणातील अद्श्य शक्तींनी दीड हजारहून अधिक दूध संस्थांना मतदानाचा अधिकार मिळू नये यासाठी प्रयत्न केले. दूध उपनिबंधकासमोर सुनावण्या झाल्या. सहकार न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात सुनावण्या झाल्या. अखेर दूध संस्थाना न्यायालयात न्याय मिळाला आणि मतदारांना अधिकार मिळाला. (The ‘Elder Brother’ slogan in Gokul)

मुश्रीफ, महाडिकांचा मोठा भाऊ असल्याचा दावा

गोकुळची निवडणूक महायुती लढणार हे मंत्री हसन मुश्रीफ सुरवातीपासून सांगत आहेत. तर एकेकाळचे त्यांचे गोकुळमधील सहकारी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. महायुतील बेबनाव होण्याकडे त्यांचे लक्ष आहे. भाजपचे राज्यसभेतील खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळमध्ये भाजपच मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचले आहे. तर मुश्रीफांनी राज्यात भाजप मोठा भाऊ, पण गोकुळमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ उत्तर दिले आहे. महाडिकांना डिवचताना गोकुळमधीला जागा वाटपाचा तिढा मुख्यमंत्रीच सोडवतील हे सांगताना महायुती मतभेद दिसू नये यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक यांनी जिल्हा बँकेप्रमाणे गोकुळमध्ये सर्वपक्षीय निवडणूक बिनविरोध व्हावी असे मत व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे सतेज पाटील यांनी पायाला भिंगरी लावून तालुक्यांचा दौरा करत गोकुळची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

अदृश्य शक्तीला हिसका दाखवणार?

गोकुळमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर कोणता पक्ष कुणाबरोबर युती करणार, कोणाबरोबर जाणार हे लवकरच कळणार आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पराभवाचे उट्टे, गोकुळच्या मागील निवडणूकीत झालेला विश्वासघाताचे आरोप आणि न्यायालयीन लढ्यातून खोडा घालणाऱ्या अद्श्य शक्तींना हिसका दाखवण्याची केलेली घोषणा यामुळे गोकुळच्या निवडणुकीत दूध चांगलेच तापणार आहे असे दिसते. (The ‘Elder Brother’ slogan in Gokul)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman