Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शंभूराज देसाईंनी जिल्हा बँकेत काढला जिल्हा परिषदेचा वचपा

शंभूराज देसाईंनी जिल्हा बँकेत काढला जिल्हा परिषदेचा वचपा

भारतीय जनता पक्षाच्या वर्चस्ववादाच्या राजकारणापुढं आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही, याचे भान ठेवत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले.

महायुतीतील या दोन पक्षांनी एकीचे बळ दाखवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश झुगारून अध्यक्षपदावर मांड ठोकली. बँकेच्या अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर (राष्ट्रवादी), तर उपाध्यक्षपदी माजी आमदार दीपक चव्हाण (शिवसेना) यांची निवड झाली. मार्च २०२६ मध्ये झालेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे पुरस्कृत हिंसाचाराच्या राजकारणाला शंभूराज देसाई यांनी अहिंसक पद्धतीने चोख उत्तर दिले.

जिल्हा परिषदेत धक्काबुक्की

मार्च २०२६ मध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतलं राजकारण संपूर्ण राज्यात गाजलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार सातारा पोलिसांनी पक्षपाती भूमिका घेतली. फडणवीसांचे राईट हँट मंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनाही जुमानले नाही. थेट पालकमंत्र्यांना धक्काबुक्की होऊन ते जखमी होईपर्यंत मजल गेली होती. विधानसभेपर्यंत हा मामला गाजला होता. त्यावेळी ६५ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (२०), शिवसेना (१५) आणि स्वाभिमानी (१) असे ३६ सदस्यांचे स्पष्ट बहुमत आघाडीकडे होते.

सत्ताधारी महायुतीतील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर !

मात्र, भाजपचे नेते जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी व शिवसेनेचे सदस्य फोडून क्रॉस व्होटिंग घडवून आणले आणि भाजपच्या प्रिया शिंदे यांना अध्यक्षपदी निवडून आणले. एकीकडे शिंदेसेना आणि राष्ट्रवादी एकत्र असताना शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नीना मात्र भाजपने पुरस्कृत केल्याचा विरोधाभासही दिसून आला होता. पालकमंत्र्यांना धक्काबुक्की, सदस्यांचे अपहरण आणि गुंडगिरीच्या माध्यमातून भाजपने जिंकलेले अध्यक्षपद यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये विशेषतः भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात मोठी कटुता निर्माण झाली होती.

बदला घेण्याची संधी

जिल्हा परिषदेतील पराभवाचा बदला घेण्याची संधी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना मिळाली. जिल्हा परिषदेतील पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दोघांनी अत्यंत सावध आणि आक्रमक पवित्रा घेतला. निवडणूक प्रक्रियेपूर्वी दोन्ही नेत्यांनी आपल्या सर्व संचालकांना एकत्र सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि मतदानाच्या दिवशी स्वतः त्यांना घेऊन बँकेत हजर झाले, जेणेकरून भाजपला फोडाफोडीला वाव मिळाला नाही.

भाजप-शिंदेसेनेचे गँगवॉर, फडणवीसांपुढे शरणागती

सगळ्या सत्ता भाजपलाच मिळाव्यात, अशा रितीने पुढे निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथेही आपला आदेश बजावण्याचा प्रयत्न केल्याचे कळते. त्यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यामार्फत अध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवाराचे नाव सुचवले होते. मात्र, मकरंद पाटील यांनी “आमचं आता ठरलंय” असे स्पष्ट सांगत हा प्रस्ताव नाकारल्याचे सांगण्यात येते. मकरंद पाटील हे भाजपच्या राज्यपातळीवरील कार्यपद्धतीबाबत आधीपासूनच नाराज आहेत. भाजप आम्हाला गृहित धरून कारभार करीत असल्याची नाराजी अलीकडेच त्यांनी जाहीरपणे एका समारंभात व्यक्त केली होती.

महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर

राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपला माघार घ्यावी लागली. परिणामी, उदयसिंह पाटील उंडाळकर (अध्यक्ष) आणि दीपक चव्हाण (उपाध्यक्ष) यांचा निवड बिनविरोध झाली.

या निवडणुकीच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील महायुती आणि भाजपमधील अंतर्गत मतभेदही समोर आले आहेत. शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी जिल्हा परिषदेतील धक्क्यानंतर एकत्र येऊन सहकार क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या संस्थेवर वर्चस्व राखले आणि भाजपला सत्तेबाहेर ठेवले.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर भाजपचा दावा सांगत मंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, सत्तेच्या शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे बोट दाखवत त्यांनी सगळे खापर त्यांच्यावर फोडले.

जयकुमार गोरे यांच्याबद्दल नाराजी

संख्याबळाचे वास्तव लक्षात घेऊन शिवेंद्रराजे भोसले यांनी समजुतदारपणाची भूमिका घेऊन जिल्हा परिषदेसारखा संघर्ष जिल्हा बँकेच्या निवडणुकीत टळला. त्यातून त्यांचा प्रगल्भपणाही समोर आला. मात्र गोरे यांनी शिवेंद्रराजेंवर जबाबदारी झटकली, त्याबद्दल शिवेंद्रराजेंनीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

साताऱ्यातून एकनाथ शिंदे यांचे काउंटडाऊन सुरू…?

यावरून सातारा जिल्ह्यातील भाजपअंतर्गत मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत. जयकुमार गोरे यांची राजकारणाची शैली राजकीय वातावरण बिघडवत असल्याची भाजपच्या अनेक नेत्यांची धारणा आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादामुळे कुणी आवाज काढत नाही. यावेळी शिवेंद्रराजेंनी त्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली.

पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात जिल्हा मध्यवर्ती बँक हे सत्तेचे मुख्य केंद्र मानले जाते. या निवडीमुळे सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण आणि सहकारी राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची पकड मजबूत झाली आहे.

सातारा जिल्हा परिषद आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांमधील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना हा सत्तासंघर्ष भविष्यात सातारा जिल्ह्यातील राजकारणाला नवीन वळण देणारा ठरू शकतो.

महायुतीत ‘स्वतंत्र’ समीकरणे

राष्ट्रवादी-शिवसेना युतीची शक्यता: पातळीवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) महायुती म्हणून एकत्र असले तरी, सातारा जिल्ह्यात भाजपचा वाढता विस्तार रोखण्यासाठी मंत्री मकरंद पाटील आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांची आघाडी भविष्यातील निवडणुकांमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकेत डावलले गेल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याने, आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप स्वबळावर लढण्याची किंवा जास्तीत जास्त जागांवर दावा करण्याची आक्रमक भूमिका घेऊ शकते.

सहकार आणि ग्रामीण सत्तेचा थेट लाभ

पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांमध्ये जिल्हा बँक आणि साखर कारखान्यांची भूमिका निर्णायक असते. जिल्हा बँकेची सत्ता राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे राहिल्यामुळे आगामी ग्रामपंचायत आणि सोसायटी निवडणुकांमध्ये ग्रामीण मतदारांवर आणि कार्यकर्त्यांवर पकड ठेवणे या दोन्ही पक्षांना सोपे जाईल.

भाजपने जिल्हा परिषदेची सत्ता मिळवून प्रशासकीय आणि विकासनिधीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पोहोचण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ‘शासकीय निधी’ (भाजप) विरुद्ध ‘सहकारी संस्थांचे जाळे’ (राष्ट्रवादी-शिवसेना) असा थेट सामना पाहायला मिळू शकतो.

भाजपमधील गटबाजीचा परिणाम

जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने भाजप नेते जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील कार्यपद्धतीतील फरक समोर आला आहे. आगामी नगरपालिका (विशेषतः सातारा, कराड, फलटण, वाई आणि माण-खटाव भाग) निवडणुकांमध्ये उमेदवारी वाटप करताना या दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय राहिला नाही, तर त्याचा थेट फायदा विरोधकांना किंवा मित्रपक्षांना होऊ शकतो.

मतदार आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रम

जिल्हा परिषदेत झालेले क्रॉस व्होटिंग आणि त्यानंतर बँकेत झालेली कोंडी यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये राजकीय कटुता वाढली आहे. वरिष्ठ नेत्यांनी जरी वरवर समेट घडवून आणला, तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते एकमेकांचे काम कितपत प्रामाणिकपणे करतील, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman