Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू,' मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

'रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू,' मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

  • रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू, फडणवीसांचा इशारा
  • वादग्रस्त विधानांमुळे रामगिरी महाराजांविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल
  • सरला बेटाच्या विकासासाठी आराखडा तयार करून प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकसित करणार

अहिल्यानगर : आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असणाऱ्या सरला बेट येथील महंत रामगिरी महाराज यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले असून “रामगिरी महाराजांना धमक्या देणाऱ्यांना आम्ही नेस्तनाबूत करू,” असा इशारा त्यांनी दिला आहे. सरला बेट येथील संत गंगागिरी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामगिरी महाराजांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना धमकी देणाऱ्यांना थेट इशारा दिला.

"रामगिरी महाराजांना काही लोक धमक्या देतात. त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू. येथील कोणाच्याही केसाला हात लावू देणार नाही," असे फडणवीस यांनी सांगितले. धर्माच्या नावावर कोणी अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा सामना करण्यासाठी आपण पुढे राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वादग्रस्त विधानांमुळे रामगिरी महाराज चर्चेत

रामगिरी महाराज यापूर्वी त्यांच्या काही वक्तव्यांमुळे वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे प्रवचनादरम्यान त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी त्यांच्या विरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते.

Devendra Fadnavis: '२०२९ पूर्वी फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं'; विजय वडेट्टीवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

तसेच 'मिशन अयोध्या' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात राष्ट्रगीताबाबत केलेल्या वक्तव्यामुळेही ते चर्चेत आले होते. राष्ट्रगीतामध्ये बदल करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यांवरूनही राजकीय आणि सामाजिक स्तरावर प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

सरला बेटाचा विकास आराखडा तयार करणार

सरला बेटाच्या विकासाबाबतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. सरला बेटाच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार करून त्यानुसार काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात सरला बेटाला प्रमुख तीर्थस्थळाचा दर्जा मिळावा आणि हे ठिकाण आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र म्हणून विकसित व्हावे, यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वारकरी संप्रदायाची १७९ वर्षांची परंपरा आजही अखंड सुरू असल्याचा उल्लेख करत फडणवीस यांनी या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. हरिनामाच्या माध्यमातून समाज एकत्र येतो आणि जात-पात विसरून भक्तीची परंपरा पुढे नेली जाते, असे त्यांनी सांगितले.

'मोदी सरकारने संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले'; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका

शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी सरकारच्या विविध योजनांचाही त्यांनी उल्लेख केला. ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या उपक्रमासह शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या निर्णयाची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, कार्यक्रमातील वातावरणात राजकीय आणि धार्मिक रंगही पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फुगडी खेळली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामगिरी महाराज यांच्यातही फुगडीचा खेळ रंगला. या प्रसंगाची उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा झाली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra