Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अलास्कातील विमान दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू

अलास्कातील विमान दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू

घनदाट धुक्यामुळे विमान कोसळले

मेरिकेच्या अलास्का राज्यात घनदाट धुक्यामुळे झालेल्या भीषण विमान अपघातात विमानातील आठही जणांचा मृत्यू झाला. पश्चिम अलास्कातील दुर्गम केप न्यूएनहॅम लाँग रेंज रडार साइटजवळ गुरुवारी हा अपघात झाला.

सेस्ना ४४१ हे ट्विन-इंजिन चार्टर्ड विमान अँकरेज येथून केप न्यूएनहॅमच्या दिशेने जात होते. मात्र, उतरण्याच्या वेळी परिसरात अचानक दाट धुके पसरल्याने परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली.

विमानाने धावपट्टीवर उतरण्याचा पहिला प्रयत्न केला; मात्र खराब दृश्यमानतेमुळे वैमानिकांना धावपट्टी दिसू शकली नाही. त्यामुळे पहिला प्रयत्न सोडून देण्यात आला. त्यानंतर वैमानिकांनी दुसऱ्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. या वेळीही दृश्यता अत्यंत कमी होती आणि वैमानिकांना केवळ उड्डाण उपकरणांच्या आधारे विमान नियंत्रित करावे लागत होते. याच दुसऱ्या प्रयत्नादरम्यान विमानाचा संपर्क तुटला आणि ते धावपट्टीपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर कोसळले.

हरित लवादाला आदेश; श्री श्री रविशंकर यांना ५ कोटींचा दंड परत करा!

राष्ट्रभक्तीचे आवरण घालून काँग्रेस स्वतःला किती लपवणार?

जेन झी साठी भाजपाची मोठी नवी रणनीती

अपघाताच्या वेळी हवामान झपाट्याने खराब होत असल्याचेही समोर आले आहे. सुरुवातीला परिसरातील दृश्यमानता सुमारे १० मैल होती; मात्र काही वेळातच ती पाव मैलापेक्षाही कमी झाली. त्यामुळे वैमानिकांसमोर विमान सुरक्षितपणे उतरवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. केप न्यूएनहॅमची धावपट्टी डोंगराळ भागाने वेढलेली असून, खराब हवामानात येथे विमान उतरवणे अधिक कठीण ठरते.

या विमानात दोन वैमानिकांसह सहा प्रवासी होते. मृतांमध्ये अमेरिकन आर्मी कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सचे दोन कर्मचारी आणि चार कंत्राटदारांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे विमान सिक्युरिटी एव्हिएशन या अँकरेजस्थित चार्टर कंपनीकडून चालवले जात होते. प्रवासी दुर्गम रडार केंद्राशी संबंधित महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करत होते.

या दुर्घटनेनंतर अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने (NTSB) तपास सुरू केला आहे. खराब हवामान, वैमानिकांचा निर्णय, विमानाची तांत्रिक स्थिती आणि दुसऱ्यांदा उतरण्याचा घेतलेला निर्णय या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेने अलास्काच्या दुर्गम भागातील प्रतिकूल हवामानात होणाऱ्या विमान प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka