इस्लामाबाद-काबूलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष अद्याप धगधगत असताना पाकिस्तानने अफगाण विद्यार्थ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानातील मेडिकल आणि डेंटल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अफगाण विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर या निर्णयाचा परिणाम होणार आहे.
यासोबतच चालू शैक्षणिक सत्रात अफगाण विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश देण्यासही बंदी घालण्यात आली आहे. इस्लामाबाद आणि काबूलमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
पाकिस्तान मेडिकल अँड डेंटल कौन्सिलने म्हणजेच PMDCने देशातील वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, सध्याच्या शैक्षणिक सत्रात अफगाण नागरिकांना मेडिकल किंवा डेंटल अभ्यासक्रमात प्रवेश, प्लेसमेंट, ट्रान्सफर किंवा मायग्रेशनची परवानगी दिली जाणार नाही. पुढील आदेश येईपर्यंत ही व्यवस्था लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानमध्ये यापूर्वीच मेडिकल आणि डेंटल अभ्यासक्रमात दाखल असलेल्या अफगाण विद्यार्थ्यांनाही अफगाणिस्तानात परतण्यास सांगण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या परतीसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याचे आणि आवश्यक एनओसी देण्याचे निर्देश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पदवीच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या विद्यार्थ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. लाहोरमधील किंग एडवर्ड मेडिकल युनिव्हर्सिटीने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केल्याचे समोर आले आहे. विद्यापीठातील २२ अफगाण विद्यार्थ्यांना आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २४ तासांचा कालावधी देण्यात आल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या निर्णयाबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. वैध पासपोर्ट आणि व्हिसा असलेल्या अफगाण विद्यार्थ्यांच्या व्हिसा विस्ताराच्या अर्जांवर विद्यमान नियमांनुसार प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सज्जाद हैदर खान यांनी सांगितले. मात्र, वैध कागदपत्रांशिवाय पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर बेकायदेशीर परदेशी नागरिकांच्या पुनर्वसन योजनेनुसार कारवाई होऊ शकते.
मुंबई विमानतळाजवळील अनधिकृत मशिदीवर चालणार बुलडोझर
प्रा.शोभिता जैन; हेवा वाटावे असे लखलखीत आयुष्य…
अमेरिका-इराण संघर्षात पाकिस्तानची होतेय 'तारेवरची कसरत'
अफगाण विद्यार्थ्यांबाबतचा हा निर्णय दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानच्या भूमीवरून तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या संघटनेच्या कारवाया होत असल्याचा आरोप केला जातो. अफगाणिस्तानातील तालिबान प्रशासनाने हे आरोप नाकारले आहेत. या मुद्द्यावरून इस्लामाबाद आणि काबूलमधील संबंध गेल्या काही काळात अधिक तणावपूर्ण झाले आहेत.

