आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री
भारतीय शेअर बाजारात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या दराने १०० डॉलर प्रति बॅरलचा टप्पा गाठल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
त्यातच आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने बाजारावर दबाव वाढला. दिवसअखेर सेन्सेक्स ८१३.३५ अंकांनी म्हणजेच १.०८ टक्क्यांनी घसरून ७४,७६४.२३ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी २०३.६० अंकांनी म्हणजेच ०.८६ टक्क्यांनी घसरून २३,४३१.५० अंकांवर स्थिरावला. दोन्ही निर्देशांक जवळपास तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.
बाजारातील सर्वाधिक दबाव आयटी शेअर्सवर दिसून आला. एचसीएल टेक्नॉलॉजीजचा शेअर ४.५५ टक्के, इन्फोसिस ४.४३ टक्के, टेक महिंद्रा ३.८७ टक्के आणि टीसीएस २.२६ टक्क्यांनी घसरले. एचडीएफसी बँक आणि इतर मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही विक्रीचा दबाव राहिला. परिणामी निफ्टी आयटी निर्देशांकात ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
दरम्यान, पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे ब्रेंट क्रूडचा दर १०० डॉलरच्या वर गेला. भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करत असल्याने तेल महागल्यास देशाच्या आयात खर्चावर, महागाईवर आणि रुपयावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. या चिंतेमुळे गुंतवणूकदारांनी जोखीम कमी करत मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री केली.
अमेरिका-इराण संघर्षात पाकिस्तानची होतेय 'तारेवरची कसरत'
पतंग कापल्यावरून १२ वर्षांच्या शहजादने केले देववर चाकूने वार
जुहू इस्कॉनच्या रेस्टॉरंटमध्यल्या अस्वच्छतेवर तुकाराम मुंढेची कारवाई
परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि रुपयातील कमजोरीनेही बाजारातील वातावरण अधिकच नकारात्मक केले. बुधवारी रुपया ९५.१० प्रति डॉलर या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, बाजारातील घसरण सर्वच क्षेत्रांमध्ये सारखी नव्हती. धातू आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये तुलनेने चांगली कामगिरी दिसली. अदानी पोर्ट्सचा शेअर ३.६७ टक्के आणि टाटा स्टीलचा शेअर २.४२ टक्क्यांनी वधारला.
एकूणच, महागलेले कच्चे तेल, पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव, आयटी शेअर्समधील जोरदार विक्री, रुपयाची घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांचा दबाव या सर्वांचा एकत्रित परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने तीन महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली असून, आगामी काळात तेलाच्या किमती आणि जागतिक घडामोडींवर बाजाराची दिशा मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार आहे.

