शेअर बाजाराचा मोठा यू-टर्न!
भारतीय शेअर बाजारात बुधवारी (२१ ऑक्टोबर) मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. सकाळी जोरदार तेजीने सुरुवात करणाऱ्या बाजाराने अवघ्या काही तासांत अचानक यू-टर्न घेतल्याने गुंतवणूकदारांना प्रचंड आर्थिक फटका बसला.
केवळ २४५ मिनिटांत मुंबई शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य तब्बल ८ लाख ७८ हजार १३७ कोटी रुपयांनी घटले. सकाळच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना दुपारच्या सत्रात झालेल्या चौफेर विक्रीमुळे बाजारातील चित्र पूर्णपणे बदलले. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि नफावसुली यांमुळे सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांवर मोठा दबाव निर्माण झाला.
बुधवारी व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्सने सुरुवातीच्या अवघ्या ४० मिनिटांत ८२९ अंकांची झेप घेत ७४,६८२.१९ अंकांची दिवसातील सर्वोच्च पातळी गाठली. त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २३२ अंकांनी वधारून २३,१२०.९० अंकांवर पोहोचला होता. मात्र, ही तेजी फार काळ टिकली नाही. उच्च पातळीवर गुंतवणूकदारांनी नफावसुली सुरू केल्याने विक्रीचा दबाव वाढला आणि बाजाराने घसरणीची दिशा पकडली. दुपारी १ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून १,४०० अंकांहून अधिक घसरून ७३,२८१.७८ अंकांवर आला. निफ्टीमध्येही ४४८ अंकांहून अधिक घसरण होऊन तो २२,६७२.२५ अंकांवर पोहोचला. काही तासांपूर्वी तेजीचा आनंद साजरा करणाऱ्या गुंतवणूकदारांना अचानक झालेल्या या घसरणीमुळे मोठा धक्का बसला.
ज्ञानेशकुमार प्रकरणावर बोलण्यास रुबिओंचा स्पष्ट नकार
दीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी १० वर्षांच्या मुलीवर हत्येचा गुन्हा
तूर्तास सुटका नाही! सौरव दास, आशुतोष रांकाने घेतली याचिका मागे
या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ हे महत्त्वाचे कारण मानले जात आहे. ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल ११० डॉलरच्या वर गेल्याने भारताच्या आयात खर्चात वाढ होण्याची चिंता निर्माण झाली आहे. भारताला कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागत असल्याने तेलाच्या दरवाढीचा परिणाम महागाई, उत्पादन खर्च आणि कंपन्यांच्या नफ्यावर होऊ शकतो. याशिवाय जागतिक आर्थिक परिस्थितीतील अनिश्चितता आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री यामुळे बाजारातील दबाव वाढला. बजाज फायनान्स, आयशर मोटर्स आणि इटर्नल यांसारख्या कंपन्यांच्या समभागांमध्ये तीन टक्क्यांहून अधिक घसरण झाली. वाहन, वित्तीय सेवा आणि अन्य क्षेत्रांतील समभागांमध्येही विक्रीचा जोर दिसून आला.
बाजारातील या घसरणीमुळे बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य दिवसाच्या उच्चांकावरील ४६८.३० लाख कोटी रुपयांवरून घसरून ४५९.५२ लाख कोटी रुपयांवर आले. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत अवघ्या काही तासांत ८.७८ लाख कोटी रुपयांची घट झाली. आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमती, जागतिक बाजारातील संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका यांवर भारतीय शेअर बाजाराची दिशा अवलंबून राहणार आहे. तेलाचे दर उच्च पातळीवर कायम राहिल्यास महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम बाजारातील गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवरही होऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या अस्थिर वातावरणात गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय न घेता आपल्या आर्थिक उद्दिष्टांचा आणि जोखीम सहन करण्याच्या क्षमतेचा विचार करून गुंतवणुकीचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

