उद्योगपती गौतम अदाणींना टाकले मागे
टिकटॉकची पालक कंपनी बाइटडान्सचे संस्थापक झांग यिमिंग यांनी भारतीय उद्योगपती गौतम अदाणी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला आहे.
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, १५ सप्टेंबरपर्यंत झांग यिमिंग यांची संपत्ती सुमारे १०५.५ अब्ज डॉलर, तर गौतम अदाणी यांची संपत्ती १०४.८ अब्ज डॉलर इतकी आहे. म्हणजेच झांग यिमिंग हे अदाणींपेक्षा सुमारे ७० कोटी डॉलरने पुढे आहेत.
झांग यांच्या संपत्तीत सप्टेंबर महिन्यातच १२ अब्ज डॉलरहून अधिक वाढ झाली आहे. बाइटडान्सच्या नव्या खासगी मूल्यांकनात ब्लॅकरॉक, फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्स आणि टी. रो प्राइस यांसारख्या गुंतवणूकदार संस्थांच्या आकडेवारीचा विचार करण्यात आला. मार्च २०१९ मध्ये झांग यिमिंग यांची संपत्ती सुमारे १३ अब्ज डॉलर होती. म्हणजेच अवघ्या काही वर्षांत त्यांच्या संपत्तीत आठ पटींपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
ऑरेकलकडून पुन्हा १०% कर्मचारी कपात
₹२ हजारांवरील UPI व्यवहारांवर शुल्क
ऑगस्टमध्ये भारताच्या निर्यातीत २६ टक्क्यांची मोठी वाढ
दुसरीकडे, गौतम अदाणी यांची संपत्ती याच वर्षी जूनमध्ये सुमारे १२० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली होती. मात्र त्यानंतर एमएससीआय निर्देशांकातील शेअर्सच्या पुनर्संतुलनासह तेलाच्या वाढलेल्या किमती आणि बॉण्ड उत्पन्नातील वाढीमुळे बाजारावर दबाव निर्माण झाला. त्याचा परिणाम अदाणी समूहाशी संबंधित शेअर्सवर झाला आणि त्यांच्या एकूण संपत्तीत घट झाली.
झांग यिमिंग यांच्या संपत्तीच्या वाढीमागे टिकटॉकचा जागतिक विस्तार तर आहेच, पण बाइटडान्सची कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आक्रमक वाटचालही महत्त्वाची ठरली आहे. कंपनीने डौबाओ हा एआय चॅटबॉट आणि सीडान्स हे एआय आधारित व्हिडीओ निर्मितीचे साधन विकसित केले आहे. त्यामुळे सोशल मीडिया आणि शॉर्ट व्हिडीओ व्यवसायासोबतच एआय क्षेत्रातही बाइटडान्सची ताकद वाढत आहे.
झांग यिमिंग आणि गौतम अदाणी यांच्या संपत्तीतील हा फरक मात्र कायमस्वरूपी नाही. शेअर बाजारातील चढ-उतार आणि बाइटडान्ससारख्या खासगी कंपनीच्या मूल्यांकनातील बदलांनुसार अब्जाधीशांच्या संपत्तीत दररोज मोठे बदल होऊ शकतात. त्यामुळे आशियातील श्रीमंतांच्या क्रमवारीतही पुढील काळात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.

