Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'भारतासाठी पाकिस्तान तातडीचा धोका, चीन दीर्घकालीन स्पर्धक'

'भारतासाठी पाकिस्तान तातडीचा धोका, चीन दीर्घकालीन स्पर्धक'

माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे भाष्य

भारताच्या सुरक्षेसमोरील आव्हानांबाबत माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. पाकिस्तान हा भारतासाठी सध्याचा आणि तातडीचा सुरक्षा धोका आहे, तर चीन हा आगामी काळात भारताचा प्रमुख दीर्घकालीन स्पर्धक ठरेल, असे नरवणे यांनी म्हटले आहे.

मात्र, चीनला 'शत्रू' म्हणण्याऐवजी 'स्पर्धक' म्हणणे अधिक योग्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात त्यांच्या नव्या 'द क्युरियस अँड द क्लासिफाइड : अनअर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्ट्रीज' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी नरवणे यांनी भारताच्या सुरक्षा आव्हानांवर भाष्य केले. भारताचे पाकिस्तान आणि चीनसोबत युद्ध झाले आहे, तसेच दोन्ही देशांसोबत सीमावाद कायम आहेत. त्यामुळे दोन्ही देश भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आव्हान राहतील, असे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे भारताचे लक्ष सध्या पश्चिम सीमेवर अधिक केंद्रित असल्याचे नरवणे यांनी सांगितले. 'पाकिस्तानकडून दहशतवादाला सातत्याने पाठिंबा मिळत असल्याने आमचे लक्ष पश्चिम सीमेवर आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, दीर्घकालीन दृष्टिकोनातून भारतासमोरचे चित्र वेगळे असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी काळात चीन हा भारताचा मुख्य स्पर्धक ठरणार असून ही स्पर्धा केवळ लष्करी क्षेत्रापुरती मर्यादित राहणार नाही, असे नरवणे यांनी सांगितले.

नरवणे यांच्या मते, भारत आणि चीनमध्ये राजकीय, आर्थिक, व्यापार आणि लष्करी अशा सर्वच क्षेत्रांत स्पर्धा वाढणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत काही प्रमाणात संघर्षाची शक्यताही असू शकते. मात्र, चीनसोबतचे मतभेद सोडवण्यासाठी भारताने संवाद आणि राजनैतिक मार्गांचा वापर करण्याला प्राधान्य द्यावे, असे नरवणे यांनी स्पष्ट केले. बळाचा वापर हा नेहमीच शेवटचा पर्याय असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

कॉकरोच जनता पार्टीला पाकिस्तानी भट्टीचे बळ…

दुःखात 'देवाभाऊ' बनले आधार, आज बहिणीच्या नव्या संसाराची बांधली गाठ

सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर FDAचा कडक बडगा

पोलिसांच्या बळासह आंदोलनातील हिंसाचाराची होणार चौकशी

चीनसोबत संवाद आणि मुत्सद्देगिरी महत्त्वाची असली तरी त्यामागे विश्वसनीय लष्करी प्रतिबंधक क्षमता असणे आवश्यक असल्याचे नरवणे यांनी सांगितले. कोणत्याही संभाव्य गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी सदैव सज्ज राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. भारताच्या व्यापक सुरक्षा धोरणाबाबत बोलताना नरवणे यांनी नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमारमध्ये स्थैर्य निर्माण करण्यासाठी भारताने प्रयत्न करावेत, असे मत व्यक्त केले. शेजारी देशांमध्ये स्थैर्य असेल तर त्याचा थेट फायदा भारताच्या सुरक्षेला होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 'भारताचे अंतिम उद्दिष्ट शांतता असले पाहिजे; मात्र त्या शांततेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक लष्करी क्षमता देशाकडे असली पाहिजे,' असा संदेश नरवणे यांनी दिला. त्यांच्या मते, शांतता हवी असेल तर युद्धासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka