Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बिश्नोई टोळीवर निज्जरच्या हत्येचा आदेश दिल्याचा आरोप

बिश्नोई टोळीवर निज्जरच्या हत्येचा आदेश दिल्याचा आरोप

NEWS डंका 2 weeks ago

अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये २४ जणांना अटक

मेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) च्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या 'ऑपरेशन हार्ड बॉल' या बहुराष्ट्रीय मोहिमेत भारताशी संबंधित तीन आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत तुरुंगात असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा निकटवर्तीय सतिंदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार यांच्यावर कॅनडातील खलिस्तानी फुटीरतावादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येचा आदेश दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या संयुक्त कारवाईत अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये २४ जणांना अटक करण्यात आली असून ३७ आरोपींविरुद्ध संघीय आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्निया, इंडियाना, जॉर्जिया, कॅनडा आणि स्पेनसह विविध ठिकाणी ५० हून अधिक शोध वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली. या कारवाईत २४ आरोपींना अटक करण्यात आली असून १० आरोपी अद्याप फरार आहेत. उर्वरित आरोपी आधीच विविध तुरुंगांत असल्याचे सांगण्यात आले.

आरोपपत्रानुसार, लॉरेन्स बिश्नोईने भारतातील तुरुंगातूनच आपल्या जागतिक गुन्हेगारी नेटवर्कचे संचालन केले. १८ जून २०२३ रोजी ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येचा आदेश बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी दिला, असा दावा अमेरिकी अभियोक्त्यांनी केला आहे. निज्जर याच्या हत्येनंतर तत्कालीन कॅनेडियन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतीय सरकारी एजंटांवर संशय व्यक्त केला होता. मात्र, भारताने हे आरोप फेटाळून लावत ते 'हास्यास्पद आणि हेतुपुरस्सर' असल्याचे म्हटले होते. अमेरिकेच्या या आरोपपत्रात मात्र भारतीय सरकारचा कोणताही थेट उल्लेख करण्यात आलेला नाही.

अमेरिकी तपास यंत्रणांच्या मते, बिश्नोई अवैध मोबाईल फोन आणि इंटरनेट-आधारित संवाद माध्यमांचा वापर करून तुरुंगातूनच हत्या, खंडणी, अपहरण, अमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी आणि इतर गुन्हेगारी कारवायांचे नियंत्रण करत होता. या नेटवर्कमध्ये गोल्डी ब्रार हा उत्तर अमेरिकेतील कारवायांचा प्रमुख समन्वयक तर रोहित गोदारा हा युरोपमधील कारवायांवर देखरेख करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अभियोक्त्यांच्या म्हणण्यानुसार, या टोळीने विशेषतः उत्तर अमेरिका आणि इतर देशांतील भारतीय वंशाच्या व्यावसायिकांना लक्ष्य करून खंडणी वसूल केली. पीडितांना व्हॉट्सअॅपसारख्या एनक्रिप्टेड अॅप्सद्वारे धमक्या दिल्या जात होत्या. त्यांच्याकडून लाखो डॉलर्सची खंडणी मागितली जात होती. धमक्यांना बळी न पडणाऱ्यांवर हिंसक हल्ले करण्याचाही कट रचला जात होता. तपासात टोळीने सोशल मीडियाचा वापर करून स्वतःची दहशत निर्माण केली आणि प्रतिस्पर्ध्यांना धमकावल्याचेही समोर आले आहे.

न्याय विभागाच्या म्हणण्यानुसार, बिश्नोई नेटवर्कने आंतरराष्ट्रीय कोकेन तस्करी आणि खंडणी याद्वारे आपल्या गुन्हेगारी कारवायांसाठी निधी उभारला. या टोळीने प्रतिस्पर्धी तस्करांकडील कोकेनचे साठे लुटून अमेरिका आणि कॅनडामध्ये अमली पदार्थांची वाहतूक केली. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी सुमारे १,००० किलो कोकेन, एक किलो हेरॉईन, १२ अग्निशस्त्रे आणि ४० हजार डॉलर्सची रोकड जप्त केली.

नवी मुंबईत भरधाव कारने १० जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू

'ट्रम्पना बगराम तळ फक्त स्वप्नातच मिळेल' तालिबान मंत्र्यांचा टोला

मोदींच्या उपक्रमांवर कॉपीराइट नाही हे नशीब…इंडोनेशियाच्या पंतप्रधानांनी केला विनोद

ओपेकचा मोठा निर्णय; तेलाचे दर कोसळण्याची चिन्हे!

'ऑपरेशन हार्ड बॉल'मध्ये बिश्नोई नेटवर्कव्यतिरिक्त जगू भगवानपुरिया टोळीवरही आरोप ठेवण्यात आले आहेत. ही टोळी अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडपर्यंत कार्यरत असल्याचा दावा आहे. या टोळीवर सुपारी घेऊन हत्या, अपहरण, खंडणी, शस्त्रांची तस्करी आणि आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ व्यापाराचे आरोप आहेत. तिसरे आरोपपत्र रवींदर सिंग धांडा उर्फ 'रँडी', 'रोलेक्स' आणि 'जॉन विक' यांच्या नेतृत्वाखालील कॅनडास्थित अमली पदार्थ तस्करी नेटवर्कविरोधात दाखल करण्यात आले आहे. या नेटवर्कद्वारे दर आठवड्याला शेकडो किलो कोकेन आणि मेथॅम्फेटामाइन अमेरिकेतून कॅनडात पोहोचवले जात असल्याचा आरोप आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka