वडिलांच्या तक्रारीवरून कारवाई
परीक्षेदरम्यान 'चॅटजीपीटी'चा वापर करताना पकडल्या गेलेल्या आयआयटी मुंबईच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
साहिलच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, तक्रारीत नमूद केलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात शिकणाऱ्या साहिलने शुक्रवारी परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड करून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. त्यावेळी त्याच्याकडे मोबाइल आढळून आला. त्यानंतर शिक्षक आणि विभागप्रमुखांनी त्याच्याशी चर्चा करून समुपदेशन केले. तसेच, या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचे आश्वासन देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चर्चेनंतर साहिल आपल्या वसतिगृहातील खोलीत परतला. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी तो खोलीत मृतावस्थेत आढळला. दरम्यान, त्याच्याविरोधात कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती, असे आयआयटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नुकसानीचा दावा करण्याइतपतही अब्रू शिल्लक नाही काय?
सौदीकडून भारताला तेलपुरवठा घटण्याची शक्यता
११ टन साहित्य घेऊन नेपाळसाठी नववे विमान रवाना
वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा
साहिलच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत काही व्यक्तींची नावे घेतली आहेत. त्यांच्या जबाबात नमूद केलेल्या सर्व व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, साहिलच्या मृत्यूशी त्यांचा कथित संबंध काय आहे, याचा तपास केला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. साहिलच्या आईने मात्र मुलाचा छळ झाल्याचा आरोप केला आहे. 'माझ्या मुलाची हत्या झाली आहे. त्याचा तीव्र छळ करण्यात आला. मला न्याय हवा आहे. मी तक्रार दाखल केली आहे,' असे त्यांनी सांगितले.
साहिलच्या मृत्यूनंतर आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. कॉपी केल्याचा आरोप झाल्यानंतर साहिलला एका वर्षासाठी निलंबित करण्याची धमकी देण्यात आली होती, असा दावा आंदोलक विद्यार्थ्यांनी केला. निलंबन झाल्यास त्याला वसतिगृह सोडून कॅम्पसबाहेर राहावे लागले असते, असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. शिस्तभंगाच्या कारवाईची भीती आणि त्याच्यावर असलेल्या दबावामुळे साहिलने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. मात्र, या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
साहिलच्या कुटुंबीयांनी या घटनेमागे जातीयवाद आणि 'संस्थात्मक छळ' असल्याचा आरोप केला आहे. त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींना अटक होईपर्यंत मृतदेह घेऊन कॅम्पस सोडणार नसल्याची भूमिका वडील रवींद्र वाकोडे यांनी घेतली आहे. यवतमाळ येथील वाकोडे कुटुंबीय शनिवारी आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये दाखल झाले. दरम्यान, आयआयटी मुंबईने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, साहिलचे मित्र, वर्गमित्र, प्राध्यापक आणि या घटनेमुळे प्रभावित झालेल्यांना संस्थेकडून आवश्यक आधार दिला जात असल्याचे म्हटले आहे. मृत्यूच्या परिस्थितीची संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याचेही संस्थेने स्पष्ट केले. पवई कॅम्पसमध्ये गेल्या सहा महिन्यांत विद्यार्थ्याच्या आत्महत्येची ही तिसरी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.

