खाण व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात
चीनच्या उत्तरेकडील शांक्सी प्रांतातील (Shanxi Province) एका कोळसा खाणीत भीषण वायू स्फोट झाल्याचे समोर आले आहे. या स्फोटात किमान ८२ कामगारांचा मृत्यू झाला आहे.
हा अपघात शुक्रवारी (२२ मे) सायंकाळी सुमारे ७.३० वाजता चांग्झी शहरातील किनयुआन काउंटीमधील लिऊशेन्यू कोळसा खान येथे घडला. स्फोटाच्या वेळी खाणीत सुमारे २४७ कामगार काम करत होते. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आणि अनेक कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, कार्बन मोनॉक्साइड वायूच्या प्रभावामुळे मृतांचा आकडा सतत वाढत गेला.
अपघातग्रस्त कोळसा खाण तोंग्झू ग्रुपच्या मालकीची असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर खाण संचालनाशी संबंधित काही अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुरक्षा नियमांचे पालन करण्यात झालेल्या संभाव्य निष्काळजीपणाची चौकशी केली जात आहे. शांक्सी हा चीनमधील सर्वात मोठा कोळसा उत्पादक प्रदेश मानला जातो. गेल्या काही वर्षांत खाण सुरक्षा सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी, या भागातील खाण दुर्घटना अजूनही चिंतेचा विषय ठरत आहेत.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून बचाव आणि मदतकार्य अधिक वेगाने राबवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्यासह अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. स्थानिक प्रशासन आणि बचाव यंत्रणा अद्याप घटनास्थळी कार्यरत असून मदतकार्य सुरू आहे. अनेक कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
…म्हणून अमेरिकेच्या गुप्तचर संचालक तुलसी गबार्डनी पद सोडले!
लेहमध्ये कोसळलेल्या 'चीता' हेलिकॉप्टरचे फोटो व्हायरल
मुंबई विमानतळावर सापडले ११.२५ कोटींचे कोकेन
पुलवामाचा मास्टरमाइंड हमझाच्या अंत्यविधीला नामचीन दहशतवादी
तज्ज्ञांच्या मते, चीनच्या खाण उद्योगात वारंवार घडणारे असे अपघात सुरक्षा व्यवस्था आणि देखरेख यंत्रणेतील त्रुटींवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. या घटनेनंतर देशभरातील खाणींमध्ये सुरक्षा तपासण्या अधिक कठोर करण्याचे संकेत चीन सरकारने दिले आहेत.

