Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डाबरला मध, तूपासह अनेक उत्पादनांची विक्री थांबवण्याचे आदेश

डाबरला मध, तूपासह अनेक उत्पादनांची विक्री थांबवण्याचे आदेश

NEWS डंका 2 weeks ago

ग्राहकांची दिशाभूल करणारे दावे केल्याचा ठपका, FSSAI ची कारवाई

देशातील अन्न सुरक्षा नियामक संस्था भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) डाबर इंडिया लिमिटेडला '१००%' दाव्यांसह विक्री होत असलेल्या अनेक खाद्यपदार्थांची विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

ग्राहकांची दिशाभूल करणारे आणि पडताळणी करता न येणारे दावे केल्याचा ठपका ठेवत FSSAI ने ही कठोर कारवाई केली आहे.

FSSAI ने जारी केलेल्या आदेशानुसार, डाबर हनी, ॲपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन कोकोनट ऑइल, तीळ तेल, गायीचे तूप, नारळ पाणी, नारळाचे दूध आणि अशा इतर उत्पादनांच्या लेबलवर किंवा कंपनीच्या संकेतस्थळावर '१००% Natural', '१००% Pure', '१००% Purity Guaranteed', '१००% Organic' तसेच '१००% Tender Coconut Water' असे दावे करण्यात आले होते. नियामकाच्या मते, हे दावे Food Safety and Standards (Advertising & Claims) Regulations, २०१८ चे उल्लंघन करतात. कारण अशा प्रकारचे दावे संदिग्ध, अप्रमाणित आणि ग्राहकांची दिशाभूल करणारे ठरू शकतात.

FSSAI च्या तपासात Dabur Himalayan Organic Apple Cider Vinegar आणि Dabur Organic Honey या उत्पादनांवर वैध FSSAI सेंद्रिय प्रमाणन (Organic Endorsement) नसतानाही 'जैविक भारत' (Jaivik Bharat) लोगो वापरण्यात आल्याचे आढळले. तसेच Dabur Hommade Coconut Milk या उत्पादनावर '१००% Purity' असा दावा करण्यात आला होता. नियामकाने स्पष्ट केले की, मिश्र (Compound) खाद्यपदार्थांसाठी अशा प्रकारचा दावा नियमांनुसार मान्य नाही.

FSSAI ने सांगितले की, यापूर्वीही डाबरला अशा दिशाभूल करणाऱ्या '१००%' दाव्यांचा वापर तात्काळ बंद करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, कंपनीकडून समाधानकारक सुधारात्मक कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता संबंधित उत्पादनांची विक्री त्वरित थांबवण्याचे आदेश देण्यात आले असून, १५ दिवसांच्या आत केलेल्या कारवाईचा अहवाल (Action Taken Report - ATR) सादर करण्याचे निर्देशही कंपनीला देण्यात आले आहेत.

भारतासह ६० देशांवरील शुल्काला अमेरिकेत न्यायालयीन आव्हान

ऊर्जाक्षेत्रात भारताची 'सोलर पॉवर'; अमेरिकेला टाकले मागे

दहशतवादी प्रचारप्रकरणी झारखंडमधून पाच जण ताब्यात

नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस यांचा तृणमूलला रामराम

या कारवाईनंतर डाबर इंडियाने प्रतिक्रिया देताना सांगितले की, FSSAI ची नोटीस प्राप्त झाली असून, नोटिशीत नमूद केलेल्या वेबसाइटवरील मजकुराची तपासणी सुरू आहे. नियामकाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा कंपनी आढावा घेत असल्याचेही डाबरने स्पष्ट केले.

अलीकडच्या काही महिन्यांत FSSAI ने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दाव्यांवर कारवाई अधिक तीव्र केली आहे. विविध खाद्य उत्पादक कंपन्या, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, ऊर्जा पेय उत्पादक तसेच मद्य उत्पादक कंपन्यांवरही नियामकाने अलीकडे कारवाई केली आहे. ग्राहकांना अचूक आणि पारदर्शक माहिती मिळावी, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे FSSAI ने स्पष्ट केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka