Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डे-केअरमध्ये चिमुकल्यांचा छळ; टॉयलेट जेटस्प्रेने पाणी, वॉशिंग मशीनमध्ये कोंडले

डे-केअरमध्ये चिमुकल्यांचा छळ; टॉयलेट जेटस्प्रेने पाणी, वॉशिंग मशीनमध्ये कोंडले

पाच महिला कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा

र्नाटकची राजधानी बंगळुरू येथील एका आयटी कंपनीच्या कॅम्पसमधील डे-केअर सेंटरमध्ये दोन ते तीन वर्षांच्या चिमुकल्यांवर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही आणि मोबाईल व्हिडिओंमध्ये डे-केअरमधील महिला केअरगिव्हर्स मुलांना मारहाण करताना, वॉशिंग मशीनमध्ये बसवत असल्याचे, बाथरूममध्ये कोंडून ठेवत असल्याचे आणि टॉयलेट जेटने त्यांच्या तोंडात पाणी मारत असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच महिला कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

ही घटना बंगळुरूतील ब्रूकफिल्ड परिसरातील कॅपजेमिनीच्या एचएएल कॅम्पसमध्ये असलेल्या डे-केअर सेंटरमधील असल्याचे समोर आले आहे. या डे-केअरमध्ये कंपनीचे कर्मचारी आपल्या लहान मुलांना कामाच्या वेळेत ठेवत होते. व्हॉट्सअॅपवर काही धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार बाल मदत हेल्पलाइन आणि पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर एचएएल पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

तक्रारीनुसार, मुलं रडू लागली किंवा आवाज करू लागली की त्यांना शिक्षा म्हणून फ्रंट-लोडिंग वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये बसवले जात होते. काही मुलांना बाथरूममध्ये कोंडून ठेवण्यात आले, तर काहींना वेस्टर्न टॉयलेटवर जबरदस्तीने बसवून टॉयलेट जेट स्प्रेने त्यांच्या तोंडात पाणी मारल्याचा आरोप आहे. मुलांना गप्प बसण्यासाठी धमकावले जात होते. हे सर्व प्रकार दोन ते तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्यांवर घडल्याचा आरोप असून त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या प्रकरणात मंजुळा, विजयलक्ष्मी, सिंधू, भवानी आणि बिंदू या पाच महिला केअरगिव्हर्सविरोधात संबंधित कलमांखाली तसेच बाल न्याय (Juvenile Justice) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित महिलांची चौकशी सुरू केली असून व्हायरल व्हिडिओंची सत्यता, घटना नेमकी कधी घडली आणि आणखी किती मुलांवर अशाच प्रकारे अत्याचार झाले का, याचा तपास सुरू आहे. अद्याप अटक झालेली नसली तरी तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

घटनेनंतर कॅपजेमिनीने आपल्या बंगळुरू कॅम्पसमधील डे-केअर सेंटर तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात, 'आमच्या कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य, सुरक्षा आणि कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. या प्रकरणाच्या तपासात आम्ही संबंधित यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहोत. खबरदारीचा उपाय म्हणून ऑन-कॅम्पस डे-केअर सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे,' असे म्हटले आहे.

भूकंपग्रस्त भागातून रोकड लुटली; व्हेनेझुएलाच्या चार पोलीस अधिकाऱ्यांना अटक

रशियाचा युक्रेनवर ड्रोन-मिसाइल हल्ला; निवासी इमारतींचे मोठे नुकसान

विक्रोळीच्या पुलामुळे वाढली डोकेदुखी, प्रवाशांचा, चालकांचा संताप

विम्बल्डनमध्ये सेरेनाच्या पुनरागमनाला धक्का

या घटनेमुळे आपल्या मुलांना सुरक्षित समजून डे-केअरमध्ये ठेवणाऱ्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. अनेक पालकांनी कॉर्पोरेट कॅम्पसमधील डे-केअर केंद्रांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. बालसंगोपन केंद्रांमध्ये सीसीटीव्ही देखरेख, कर्मचारी पडताळणी, प्रशिक्षण आणि नियमित तपासणीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली असून बालसुरक्षेच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka