मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्ला
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'रिजीम चेंज' अर्थात सत्ताबदलाच्या वक्तव्यावरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधकांना लोकशाही पद्धतीने निवडणूक जिंकून सत्तेत येण्याची शक्यता नसल्याने ते लोकशाही प्रक्रियेबाहेरून केंद्र सरकार उलथवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण अर्थात एसआयआरला विरोध हा केवळ निमित्त असून, त्यामागे प्रत्यक्षात लोकशाहीला विरोध आणि 'रिजीम चेंज'चे कारस्थान आहे, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांनी शनिवारी 'एक्स'वरील पोस्टद्वारे विरोधकांवर निशाणा साधला. पात्र मतदारांच्या मतदानातून लोकशाही मार्गाने सत्तेत येण्याची शक्यता नसल्याने त्यांचे 'सत्य' अखेर बाहेर आले आहे. देशात अराजकता निर्माण करून सत्ता मिळवण्याचा त्यांचा कट उघड झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.
गोव्यात ३०० सीजीपी आंदोलकांवर पोलीस केस दाखल
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील
दीपके, प्रशांत भूषण हे तर मोहरे रिजिम चेंजच्या खेळाचा रिंगमास्टर वेगळाच
'ते एसआयआरला विरोध का करतात? कारण त्यांना 'रिजीम चेंज' हवे आहे,' असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत येण्याची संधी नसल्यानेच विरोधक 'रिजीम चेंज'ची भाषा करत असल्याचेही त्यांनी म्हटले. फडणवीस यांनी पुढे आरोप केला की, 'त्यांना सरकार उलथवायचे आहे, पण लोकशाही मार्गाने नाही.' एसआयआरला केला जाणारा विरोध हा केवळ एक बहाणा असून, प्रत्यक्ष विरोध लोकशाही व्यवस्थेलाच असल्याचा दावा त्यांनी केला. पात्र नागरिकांच्या मतांनाही विरोधकांचा विरोध असल्याचे त्यांनी म्हटले.
'आपल्याला लोकशाही हवी आहे की 'रिजीम चेंज'ची भाषा करणारे लोक हवे आहेत, हे आता आपण ठरवायचे आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी एसआयआरला पर्याय नाही,' असे फडणवीस यांनी म्हटले.
'रिजीम चेंज'वरून राजकीय संघर्ष
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सुरू असलेल्या लढ्याला 'रिजीम चेंज'ची लढाई म्हटले होते. तसेच ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा यांनी बांगलादेशातील 'जेन-झेड' आंदोलनाचा संदर्भ दिला होता.
या वक्तव्यांचा भाजपने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला निवडणूक प्रक्रियेबाहेरून सत्तेतून हटवण्याच्या प्रयत्नांशी संबंध जोडला आहे. मात्र, विरोधकांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी 'रिजीम चेंज' हा शब्द वापरण्यात गैर काय, असा सवाल केला. लोकशाहीमध्ये सत्ताबदल ही सामान्य राजकीय प्रक्रिया असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे भाजपने या शब्दावरून अनावश्यक आक्रमक भूमिका घेऊ नये, असा त्यांचा सूर होता.

