२४ भारतीय खलाशी सुरक्षित
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरील जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय खलाशी असलेल्या तेलवाहू जहाजावर प्रक्षेपकाद्वारे हल्ला करण्यात आला, तर रोमानियातील सुलिना बंदराच्या नांगरक्षेत्रात एका रासायनिक टँकरला ड्रोनने लक्ष्य केले.
या दोन स्वतंत्र घटनांमध्ये एकूण २४ भारतीय खलाशी असलेल्या जहाजांचा समावेश असून, सुदैवाने सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ही माहिती दिली. दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
होर्मुझच्या सामुद्रधुनीत १६ ऑक्टोबर रोजी 'एमटी एसटी ३' या कच्च्या तेलाच्या टँकरवर प्रक्षेपकाद्वारे हल्ला करण्यात आला. या जहाजावर १५ भारतीय खलाशी कार्यरत होते. हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली होती; मात्र सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. दुसरीकडे, १४ ऑक्टोबर रोजी रोमानियातील सुलिना बंदराच्या नांगरक्षेत्रात 'यारा जे' या रासायनिक टँकरवर ड्रोन हल्ला झाला. या जहाजावर नऊ भारतीय खलाशी होते. या घटनेतही सर्व भारतीय नागरिक सुरक्षित राहिले. दोन्ही घटनांवर सरकार लक्ष ठेवून असून, जहाज व्यवस्थापन कंपन्यांशी सातत्याने संपर्क साधला जात असल्याचे सोनोवाल यांनी सांगितले.
शांतता राखणार म्हणत दिपकेने सुटकेपूर्वी भरला बॉण्ड
निमलष्करी महिला जवानाला कॉक्रोच आंदोलकाने थप्पड मारली
'यशस्वी'चं टॅलेंट वाया घालवू नका!
होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडणाऱ्या या अरुंद मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायूची वाहतूक केली जाते. त्यामुळे या भागातील संघर्षाचा परिणाम केवळ जहाजांच्या सुरक्षिततेपुरता मर्यादित राहत नाही, तर जागतिक ऊर्जा पुरवठा, कच्च्या तेलाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावरही होऊ शकतो. या मार्गावरील हल्ले आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे तेल उत्पादक देशांपासून आयातदार देशांपर्यंत अनेक अर्थव्यवस्थांसमोर अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर भारताने व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली असून, सागरी वाहतुकीचे स्वातंत्र्य आणि खलाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम आशियातील तणाव कमी करून संवाद आणि राजनैतिक चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याची गरजही भारताने अधोरेखित केली आहे. सध्या दोन्ही जहाजांवरील भारतीय खलाशी सुरक्षित असल्याने दिलासा मिळाला असला, तरी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरील वाढते सुरक्षा धोके भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. ऊर्जा आयातीसाठी परदेशी सागरी मार्गांवर अवलंबून असलेल्या भारताला आपल्या खलाशांच्या सुरक्षेसोबतच तेल आणि वायूचा अखंड पुरवठा कायम ठेवण्याचेही आव्हान आहे.

