Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इंधन साठेबाजांविरोधात कडक कारवाईचे आदेश

इंधन साठेबाजांविरोधात कडक कारवाईचे आदेश

NEWS डंका 1 month ago

कांदा आंदोलनावरून विरोधकांना देवेंद्र फडणवीसांचा टोला

राज्यात पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देत इंधन साठेबाजांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, काही ठिकाणी जाणूनबुजून भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. या अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल खरेदी करत असून त्यामुळे मागणीत अचानक वाढ झाली आहे. राज्यात पेट्रोलची मागणी सरासरीपेक्षा सुमारे २३ टक्क्यांनी वाढली असून डिझेलची मागणी तब्बल ५२ टक्क्यांनी वाढल्याची माहिती त्यांनी दिली. काही भागांमध्ये तर नेहमीपेक्षा ७० टक्के अधिक इंधन पुरवठा करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला.

हे दुसरे चक्रव्यूह मोदी भेदतील काय?

अमेरिकेतील 'तो' मूर्ख कोण? मार्को रुबियो यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही आणि तेल कंपन्यांकडून नियमित पुरवठा सुरू आहे. मात्र काही जण जादा साठा करून परिस्थिती गंभीर असल्याचा आभास निर्माण करत आहेत. त्यामुळे पुरवठा विभाग, पोलीस प्रशासन आणि जिल्हा यंत्रणेला समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

याचवेळी कांदा प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारने कांदा खरेदी दरात वाढ करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी प्रक्रिया सुरू असून राज्य सरकार केंद्राशी सातत्याने संपर्कात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 'महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. मात्र काही लोक केवळ राजकीय फायद्यासाठी आंदोलन करत आहेत,' असा आरोप त्यांनी केला.

विरोधकांना टोला लगावताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात पाणी येत नाही, तेच आता शेतकऱ्यांसाठी अश्रू ढाळत आहेत.' त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा दावा मुख्यमंत्री यांनी केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka