युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांचा मोठा परिणाम
युक्रेनकडून रशियातील तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर (रिफायनरी) सातत्याने होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांचा मोठा परिणाम आता रशियाच्या इंधन पुरवठ्यावर झाला आहे.
जगातील सर्वात मोठ्या ऊर्जा उत्पादक देशांपैकी एक असलेल्या रशियाला आता देशांतर्गत पेट्रोलची कमतरता भरून काढण्यासाठी भारतातून पेट्रोल आयात करावी लागत आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच रशियाने अशा प्रकारे भारताकडे पेट्रोलसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
उद्योग क्षेत्रातील माहितीनुसार, भारतातून समुद्रमार्गे पेट्रोलच्या खेपा रशियाकडे रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. दोन टँकरमधून प्रत्येकी सुमारे ३० ते ४० हजार मेट्रिक टन पेट्रोल रशियाला पाठवण्यात येत असून, एकूण किमान ६० हजार मेट्रिक टन पेट्रोलची पहिली खेप मार्गावर आहे. रशिया दरमहा सुमारे चार लाख मेट्रिक टन पेट्रोल आयात करण्याची तयारी करत असून भारतासोबतच बेलारूससारख्या देशांकडूनही पुरवठा वाढवला जात आहे.
गेल्या काही महिन्यांत युक्रेनने रशियातील तेल शुद्धीकरण प्रकल्प, इंधन साठवण केंद्रे, तेल टर्मिनल्स आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले आहेत. अनेक रिफायनऱ्यांचे उत्पादन ठप्प झाले असून इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी रशियातील अनेक भागांमध्ये पेट्रोलचे रेशनिंग सुरू करण्यात आले आहे. पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून इंधनाच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही देशात इंधनपुरवठ्याच्या समस्या असल्याचे मान्य केले आहे. वाहनचालक आणि उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत असून अनेक पेट्रोल पंपांवर योग्य दर्जाचे इंधन उपलब्ध नसल्याचे त्यांनी कबूल केले. परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार आवश्यक पावले उचलत असल्याचेही त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, रशियाकडून स्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करणारा भारत आता त्याच रशियाला पेट्रोलचा पुरवठाही करत आहे. जून महिन्यात भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी निम्म्याहून अधिक हिस्सा रशियाचा होता. भारतीय रिफायनऱ्यांमध्ये या कच्च्या तेलाचे शुद्धीकरण करून तयार झालेले पेट्रोल आता रशियालाच निर्यात केले जात आहे. त्यामुळे भारताची जागतिक ऊर्जा साखळीतील भूमिका आणखी महत्त्वाची बनली आहे.
डे-केअरमध्ये चिमुकल्यांचा छळ; टॉयलेट जेटस्प्रेने पाणी, वॉशिंग मशीनमध्ये कोंडले
भूकंपग्रस्त भागातून रोकड लुटली; व्हेनेझुएलाच्या चार पोलीस अधिकाऱ्यांना अटक
रशियाचा युक्रेनवर ड्रोन-मिसाइल हल्ला; निवासी इमारतींचे मोठे नुकसान
विक्रोळीच्या पुलामुळे वाढली डोकेदुखी, प्रवाशांचा, चालकांचा संताप
युक्रेनने युद्धाची रणनीती बदलत रशियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. या हल्ल्यांमुळे रशियाची तेल शुद्धीकरण क्षमता कमी झाली असून त्याचा थेट परिणाम देशांतर्गत इंधन उपलब्धतेवर झाला आहे. त्यामुळे स्वतः ऊर्जा महासत्ता असलेल्या रशियाला आता परदेशातून पेट्रोल आयात करण्याची वेळ आली असून, हा युक्रेनच्या ड्रोन मोहिमेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक आणि धोरणात्मक परिणाम मानला जात आहे.

