युरेनियम साठ्यावर तडजोडीचे संकेत
पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेत मोठी प्रगती झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर आता दोन्ही देशांमध्ये अणुकराराच्या दिशेने सकारात्मक हालचाली होत असल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे इराणने आपल्या उच्च दर्जाच्या समृद्ध युरेनियमचा साठा सोडण्यास तत्त्वतः तयारी दर्शवल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिले आहे. या घडामोडीमुळे जागतिक राजकारणासह तेलबाजारातही मोठी हालचाल सुरू झाली आहे.
अमेरिकेसोबत सुरू असलेल्या चर्चेत इराणने अण्वस्त्रनिर्मितीसाठी वापरता येऊ शकणाऱ्या समृद्ध युरेनियमच्या साठ्यावर नियंत्रण ठेवण्यास सहमती दर्शवल्याचे सांगितले जात आहे. या बदल्यात अमेरिकेकडून इराणवरील काही आर्थिक निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात. गेल्या काही वर्षांत निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली होती. तेल निर्यात कमी झाल्याने देशाला अब्जावधी डॉलरचे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे हा करार इराणसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
भारतीयांनी परदेश प्रवासावर लावला ब्रेक!
अमेरिका-इराण शांतता कराराची चांगली बातमी येणार?
पाकिस्तानच्या क्वेटामध्ये स्फोटामुळे रेल्वेचे दोन डबे घसरले; मोठी जीवितहानी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या चर्चेबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. करार अंतिम टप्प्यात असून इराणने शांततेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीत सुरू असलेला तणाव कमी करण्याबाबतही दोन्ही देशांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती समोर आली आहे. जगातील मोठ्या प्रमाणातील तेलवाहतूक या मार्गातून होत असल्याने होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली होती.
मात्र या चर्चेबाबत अजूनही काही संभ्रम कायम आहे. इराणमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देशाने अद्याप युरेनियमचा साठा परदेशात देण्यास अंतिम मंजुरी दिलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी यापूर्वीच देशाच्या अणुकार्यक्रमावर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे चर्चेत प्रगती होत असली तरी अंतिम करारासाठी अजूनही अनेक महत्त्वाचे मुद्दे प्रलंबित असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, या संभाव्य करारामुळे जागतिक बाजाराला दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर राहण्यास मदत होऊ शकते. तसेच पश्चिम आशियातील युद्धजन्य वातावरण कमी झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील ही शांतता चर्चा आता संपूर्ण जगाच्या नजरा खिळवून ठेवणारी ठरत आहे.

