१० विद्यार्थ्यांच्या तक्रारीं
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये एका प्राध्यापकावर लैंगिक छळ आणि अनुचित वर्तनाचे गंभीर आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्राध्यापकाविरोधात १० विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.
सुमारे महिनाभरापूर्वी एका विद्यार्थिनीने या प्रकरणी पहिली तक्रार केली होती. त्यानंतर काही वरिष्ठ तसेच माजी विद्यार्थ्यांनीही पुढे येत प्राध्यापकाविरोधात कथित गैरवर्तनाच्या तक्रारी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
तक्रारींनुसार, संबंधित प्राध्यापक विद्यार्थ्यांना कॅम्पसमधील आपल्या निवासस्थानी बोलावत असत. या भेटीदरम्यान अनुचित वर्तन केल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच वर्गात आणि इतर ठिकाणी आक्षेपार्ह स्वरूपाच्या टिप्पणी केल्याचेही तक्रारींमध्ये नमूद असल्याचे वृत्त आहे. काही विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या वर्तनामुळे अस्वस्थता निर्माण झाल्याचा दावा केला आहे. मात्र, या सर्व आरोपांची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. त्यामुळे तक्रारींमधील तथ्य तपासण्यासाठी विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मोदींचा टोला…लाल किल्ल्यावरून दिली 'दिमागी नक्षल'ची होमिओपॅथिक गोळी
राज ठाकरे म्हणतात, गणेशोत्सवात दंगली घडवल्या जाणार!
पहिल्या तक्रारीनंतर इतर विद्यार्थ्यांनीही पुढे येत आपले अनुभव मांडल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. चौकशीदरम्यान आणखी विद्यार्थी तक्रार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या हे प्रकरण विद्यापीठाच्या अंतर्गत चौकशीच्या टप्प्यात असून, पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल झाल्याची माहिती नाही. त्यामुळे समितीच्या चौकशीत नेमके कोणते तथ्य समोर येते आणि त्यानंतर विद्यापीठ प्रशासन संबंधित प्राध्यापकाविरोधात कोणती कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

