१९व्या शतकातील ऐतिहासिक वास्तू
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या पत्नी प्रिसिला चॅन यांनी आयर्लंडमध्ये तब्बल ३३५ कोटी रुपयांपर्यंत किंमत असलेला ऐतिहासिक किल्ला खरेदी केला आहे.
आयर्लंडच्या दक्षिण-पूर्व भागातील वॉटरफोर्ड काउंटीमध्ये असलेला 'स्ट्रॅन्कली कॅसल' हा १९व्या शतकातील गॉथिक शैलीतील भव्य किल्ला असून, त्याच्यासोबत तब्बल ४४० एकरांचा विस्तीर्ण भूभागही आहे. ही खरेदी ऑफ-मार्केट व्यवहारातून काही आठवड्यांपूर्वी झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या व्यवहाराची अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नाही. आयरिश टाइम्सच्या अहवालानुसार या मालमत्तेची किंमत २० ते ३० दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे २२३ ते ३३५ कोटी रुपये असू शकते.
सुमारे १८३० मध्ये माजी खासदार जॉन केली यांच्यासाठी बांधण्यात आलेला हा किल्ला रिव्हर ब्लॅकवॉटरच्या काठावर वसलेला आहे. तब्बल १६ हजार चौरस फुटांच्या या वास्तूमध्ये भव्य खोल्या, टॉवर सुइट्स, ग्रंथालय, डायनिंग रूम आणि ड्रॉइंग रूमचा समावेश आहे. किल्ल्याचा विस्तार इतका मोठा आहे की स्वयंपाकघरापासून डायनिंग रूमपर्यंत पोहोचण्यासाठीही काही मिनिटांचा पायी प्रवास करावा लागतो. मागील मालक मायकेल अॅलन-बकली आणि त्यांच्या पत्नी जियानकार्ला यांनी सुमारे २५ वर्षे या इस्टेटची देखभाल केली आणि तिचे पुनरुज्जीवन केले. आता झुकरबर्ग कुटुंब या ऐतिहासिक वास्तूची देखभाल आणि संवर्धन पुढे सुरू ठेवणार आहे.
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरवाढीने ग्राहकांची चिंता वाढली
झुकरबर्ग आणि प्रिसिला चॅन यांचे मुख्य वास्तव्य अमेरिकेतच राहणार असून, आयर्लंडला भेट देताना या किल्ल्याचा वापर निवासासाठी केला जाणार आहे. या खरेदीमागे आयर्लंडमधील मेटाच्या मोठ्या उपस्थितीचाही संबंध आहे. मेटाचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय डब्लिनमध्ये असून, कंपनीचे आयर्लंडमध्ये सुमारे १,५०० कर्मचारी आहेत. झुकरबर्ग यांच्याकडे यापूर्वीही अमेरिकेतील कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, वॉशिंग्टन डीसी आणि हवाई येथे मोठ्या प्रमाणावर मालमत्ता असल्याचे अहवाल आहेत. त्यामुळे ३३५ कोटींच्या या ऐतिहासिक किल्ल्याची खरेदी त्यांच्या वाढत्या आलिशान रिअल इस्टेट पोर्टफोलिओमध्ये आणखी एका मोठ्या भर म्हणून पाहिली जात आहे.

