Dailyhunt
कुरारमध्ये इमारतीत शिरून हल्ला करणाऱ्या गर्दुल्ल्याविरोधात फक्त 'एनसी'

कुरारमध्ये इमारतीत शिरून हल्ला करणाऱ्या गर्दुल्ल्याविरोधात फक्त 'एनसी'

NEWS डंका 2 months ago

पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन

दिंडोशी आणि कुरार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येणारा मालाड, पठाणवाडी पिंपरीपाडा या भागात होणारे रिक्षा आणि इतर गाड्यांचे मोठे पार्किंग, आसपासच्या निवासी संकुलात याच पार्किंगच्या आड गर्दुल्ल्यांचा होणारा त्रास यामुळे रहिवाशांकडून संताप व्यक्त होत असून या सगळ्या त्रासातून परिसराची मुक्तता करावी, नागरिकांना सुखाने जगू द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

कुरारमधील व्हॅलेन्टाइन संकुलात एका गर्दुल्ल्याने घुसून रहिवाशावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्याविरोधात फक्त एनसी दाखल करण्यात आली. या प्रकरणी एफआयआर का दाखल करण्यात आला नाही, असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत.

पोलिसांनीही या परिसरातील रहिवाशांच्या मागण्यांकडे लक्ष देत कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
कुरारमधील व्हॅलेन्टाइन संकुलातील एका इमारतीत रात्री शिरलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्या इमारतीतील रहिवाशावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून काहीतरी हिसकावण्याचा त्याचा प्रयत्न होता, शेवटी त्याने इमारतीच्या सुरक्षा रक्षकाची काठी घेऊन या रहिवाशावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. त्यात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही मात्र या सगळ्या प्रकारामुळे व्हॅलेन्टाइन संकुलातील आणि आसपासच्या इतर संकुलातील रहिवासी घाबरले आहेत. सदर घटना इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये नोंद झाली असून ती पोलिसांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. या इमारतीत घुसलेला इसम हा गर्दुल्ला असल्याचा आरोप सदर रहिवाश्याने केला असून त्यासंदर्भात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या सीसीटीव्हीत हे दिसते आहे की, सदर इसम त्या इमारतीतील रहिवाशाच्या मागे लागला आहे. तो रहिवासी त्याच्या हातात न सापडल्यामुळे त्याने चौकीदाराची काठी हातात घेऊन रहिवाशाच्या दिशेने धाव घेतल्याचे आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

ईरानवरील हल्ला: जागतिक अर्थव्यवस्थेला बसणारा मोठा धक्का

वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यापूर्वी गौतम गंभीर कालीघाट मंदिरात

रणजी ट्रॉफीत जम्मू-काश्मीरचा ऐतिहासिक विजय

तालिबान्यांनी पाकिस्तानी लष्करी तळ उडवले!

या व्हॅलेन्टाइन संकुलाच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यांवर रिक्षा आणि इतर वाहने पार्क केली जातात. रत्नागिरी हॉटेल ते पाण्याची टाकी असा हा रस्ता आहे. जवळपास ३०० रिक्षा तिथे पार्क असतात. त्यात रात्रीच्या वेळेस असे गर्दुल्ले, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बसत असल्याचे सांगितले जाते. त्यांच्यासाठी या रिक्षा व गाड्या आश्रयस्थान असल्याचे दिसते. असे हे गर्दुल्ले नंतर आसपासच्या इमारतीत शिरून किंवा रस्त्यांवर चालणाऱ्यांवर हल्ले करण्याची, त्यांच्याकडून मौल्यवान वस्तू चोरी करण्याची शक्यता वाढली आहे. या रस्त्याने संध्याकाळच्या वेळेला जाणे रहिवासी टाळू लागले आहेत. महिलांना विशेष भीती त्यामुळे निर्माण झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे व्हॅलेन्टाइन संकुल, रिद्धी संकुलातील लोकांनी या रस्त्याचा वापर करणे थांबवले आहे.

'न्यूज डंका'ने यासंदर्भात पोलिसांशी संपर्क साधला आणि परिस्थिती कथन केली. त्यावर पोलिसांनी सदर प्रकराची गंभीर दखल घेतल्याचे आणि कारवाई करणार असल्याचे सांगितले. दिंडोशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र पाटील म्हणाले की, आम्ही कारवाई करत आहोत. सदर पार्किंगच्या जागेवर लक्ष ठेवण्यासाठी रात्री पेट्रोलिंगही सुरू केलेले आहे. पालिकेशीही यासंदर्भात पत्रव्यवहार केला असून या पार्किंगबाबत त्यांना कळवले आहे. या पार्किंगबद्दल लोकांची तक्रार असेल तर दंडात्मक कारवाईही केली जाईल. एकूणच आम्ही कठोर कारवाई करणार आहोत.

कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनीही कारवाईचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की, प्रतिबंधक कारवाई केली जाईल. जे पार्किंग करत असतील त्यांनी तिथे देखरेख करण्यासाठी गार्ड नेमले पाहिजेत. जे या पार्किंगमधून जे भाडे वसूल करत आहेत त्यांच्यावरही जबाबदारी टाकली जाईल. मात्र पुन्हा असा प्रकार होऊ नये याची पूर्ण काळजी घेणार आहोत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka