Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महाराष्ट्र म्हणजे शौर्य, भक्ती, सुधारणा, राष्ट्रनिर्मितीचा अद्वितीय संगम!

महाराष्ट्र म्हणजे शौर्य, भक्ती, सुधारणा, राष्ट्रनिर्मितीचा अद्वितीय संगम!

NEWS डंका 3 weeks ago

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र दिनानिमित्त लिहिले खास शुभेच्छा पत्र

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

त्यांनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाचे कौतुक करत त्याला देशासाठी प्रेरणास्थान असल्याचे म्हटले. पंतप्रधानांनी नमूद केले की महाराष्ट्र हा केवळ एक राज्य नसून शौर्य, भक्ती, सुधारणा आणि राष्ट्रनिर्मितीचा अद्वितीय संगम आहे. कोकण किनाऱ्यापासून सह्याद्री पर्वतरांगांपर्यंत ही भूमी शूर वीरांच्या गाथांनी निनादत राहिली असून भक्ती चळवळ आणि वारकरी परंपरेने समाजसुधारणेला नवी दिशा दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून त्यांनी लिहिले, 'महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त तुम्हाला आणि महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक महाराष्ट्रीयनसाठी हा दिवस अत्यंत विशेष आहे. आपल्या राष्ट्राला वैशिष्ट्यपूर्ण ओळख देणाऱ्या या राज्याला आपण सर्वजण वंदन करतो.' महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विचारांचा आशीर्वाद लाभला असून ते सुशासन, धैर्य आणि राष्ट्रीय अभिमानाचे मार्गदर्शक आहेत, असे त्यांनी नमूद केले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी राज्य समृद्ध झाले असून लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांच्यासारख्या नेत्यांकडून देशभक्तीची प्रेरणा मिळाली आहे. संत परंपरेने राज्याला आध्यात्मिक बळ दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी यावर्षी महाराष्ट्रासाठी विशेष असल्याचे सांगत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती, महात्मा फुले यांची २०० वी जयंती, संत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती, महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष, बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेची १०० वर्षे यांचा उल्लेख केला. या सर्व घटनांमधून सामाजिक सुधारणा, महिला सशक्तीकरण, आध्यात्मिक जागृती आणि सामाजिक समरसतेचे महत्त्व अधोरेखित होते, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी तीन महत्त्वाच्या गोष्टींबद्दल विशेष आनंद व्यक्त केला. पहिली म्हणजे महाराष्ट्रातील १२ मराठा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश. दुसरी म्हणजे मराठी भाषेला 'शास्त्रीय भाषा'चा दर्जा मिळणे. आणि तिसरी म्हणजे पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण. पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या आर्थिक योगदानाचे कौतुक करत सांगितले की उद्योग, नवोपक्रम, वित्त, उत्पादन आणि सर्जनशीलता या सर्व क्षेत्रांत राज्य आघाडीवर आहे. २०२५-२६ मध्ये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २४,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई मेट्रोचा विस्तार, नवी मुंबई विमानतळ, वधावन बंदर, शक्तिपीठ महामार्ग आणि संभाजीनगरमधील बिडकीन औद्योगिक क्षेत्र यांसारख्या प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी राज्याच्या पायाभूत विकासावर भर दिला.

'आप'चे मुख्यमंत्री भगवंत मान झिंगलेल्या अवस्थेत?

सुप्रियाताई तुमच्या सरकारने जे काम थांबवलं ते आम्ही पूर्ण केलं!

'मिसिंग लिंक' नाही, तर 'कनेक्टिंग लिंक'!

'मिसिंग लिंक'ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

महाराष्ट्र डिजिटल पायाभूत सुविधा आणि नव्या तंत्रज्ञानातही आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. गडचिरोलीसारख्या भागांमध्ये झालेला विकास आणि गुंतवणूक हे बदलाचे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांसाठी पाणीपुरवठा, सहकार चळवळ आणि आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तयारीबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. पंतप्रधानांनी काही दुःखद घटनांचाही उल्लेख करत अजित पवार आणि आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

शेवटी, 'विकसित' आणि 'आत्मनिर्भर भारत' घडवण्यात महाराष्ट्राची भूमिका निर्णायक असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचे आशीर्वाद सदैव आपल्यावर राहो. जय महाराष्ट्र,' असे म्हणत त्यांनी पत्राचा शेवट केला.

देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र शेअर करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छांनी हा दिवस आणखी खास झाल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. नरेंद्र मोदी यांचे विचार, मार्गदर्शन आणि महाराष्ट्रासाठीचा सातत्यपूर्ण भक्कम पाठिंबा अत्यंत मोलाचा आणि प्रेरणादायी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka