Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मॅकडोनाल्ड्ससह १३ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित

मॅकडोनाल्ड्ससह १३ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली आहे.

राज्यभरातील ८९ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ७१ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली असून १३ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

या कारवाईत मुंबईतील बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब, कोलाब्यातील मॅकडोनाल्ड्सचे आउटलेट, स्टेटस रेस्टॉरंट, खार जिमखाना, नोवारा रेस्टॉरंट यांसह अन्य खाद्य आस्थापनांचा समावेश आहे. पुणे विभाग, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे.

१९ ऑगस्ट रोजी बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबची तपासणी करण्यात आली. या तपासणीत तब्बल ४७ टक्के नियमभंग आढळल्याचे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले. किचनमध्ये जिवंत माशा आणि मृत झुरळं आढळली. अन्न थेट जमिनीवर ठेवणे, अन्नाजवळ वॉशिंग पावडर आणि इतर रसायने ठेवणे, अस्वच्छ रेफ्रिजरेटर, अयोग्य पद्धतीने अन्न डीफ्रॉस्ट करणे अशा त्रुटीही आढळल्या. किचनच्या छतावरील रंग आणि प्लास्टर निघालेले होते. किचनचा दरवाजा व्यवस्थित सीलबंद नसल्याने कीटक आणि दूषित घटक आत जाण्याची शक्यता होती. कचऱ्याचे डबे स्वयंपाकाच्या स्टोव्हजवळ ठेवण्यात आल्याचेही तपासणीत समोर आले. त्यामुळे निलंबनाच्या काळात अन्नाची खरेदी, विक्री आणि वितरण थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गणेशोत्सवात मुंबईकरांसाठी अतिरिक्त लोकल-मेट्रो धावणार

'हिंदू-मुस्लिम मानसिकतेतून बाहेर या'

साखरेच्या दरांना लगाम! केंद्राचा मोठा निर्णय

कोलाब्यातील मेट्रो हाऊसमधील मॅकडोनाल्ड्सच्या आउटलेटवरही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. यापूर्वी बजावण्यात आलेल्या सुधारणा नोटीसमध्ये नमूद केलेल्या २० त्रुटींपैकी १८ त्रुटी पुन्हा तपासणीवेळी कायम असल्याचे आढळले. तपासणीदरम्यान जिवंत झुरळं, आवश्यक पेस्ट ट्रॅप्सचा अभाव, किचनच्या जमिनीवर सडलेला अन्नकचरा, अस्वच्छ कापड आणि धुळीने माखलेले दिवे आढळल्याचे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले. काही कर्मचारी घाणेरडे पादत्राणे आणि साफसफाईच्या कापडाला हात लावल्यानंतर हात न धुता तयार अन्न हाताळत असल्याचेही निरीक्षणात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka