Dailyhunt
मिराज-2000 लढाऊ विमाने २०३८-३९ पर्यंत देणार सेवा

मिराज-2000 लढाऊ विमाने २०३८-३९ पर्यंत देणार सेवा

NEWS डंका 1 month ago

स्क्वाड्रनच्या कमतरतेमुळे भारतीय हवाई दलाचा मोठा निर्णय

स्क्वाड्रनची कमतरता आणि नवीन लढाऊ विमानांच्या तैनातीमध्ये होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने (IAF) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

हवाई दलाने मिराज-2000 या लढाऊ विमानाची सेवा मुदत २०३८-३९ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आधी निश्चित केलेल्या २०३५ पर्यंतच्या सेवासमाप्ती योजनेत बदल करून घेण्यात आला असून, वायुसेनेच्या ऑपरेशनल क्षमतेत मोठी तूट निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

विशेष म्हणजे, २०१९ मधील बालाकोट एअर स्ट्राईकदरम्यान मिराज-2000 विमानांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. १२ मिराज-2000 'वज्र' फायटर्सनी रात्री अचूक हल्ले करून दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. या कारवाईत SPICE-2000 मार्गदर्शित बॉम्बचा वापर करण्यात आला होता, ज्यांची मारक क्षमता सुमारे ६० किमी स्टँड-ऑफ रेंजपर्यंत आहे.

सध्या हवाई दलाकडे कडे सुमारे ३१ फायटर स्क्वाड्रन आहेत, तर चीन आणि पाकिस्तान या दोन आघाड्यांवरील संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी ४२ स्क्वाड्रनची आवश्यकता मानली जाते. अंदाजानुसार भारताकडे सुमारे ६०० कॉम्बॅट विमानं आहेत, तर संभाव्य प्रतिस्पर्ध्यांकडे ही संख्या १००० पेक्षा अधिक आहे.

वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनीही सूचित केले आहे की बदलत्या सुरक्षा परिस्थितीत आवश्यक स्क्वाड्रनची संख्या आणखी वाढू शकते. अशा परिस्थितीत मिराज-2000 सारख्या अनुभवी प्लॅटफॉर्मला सेवेत ठेवणे रणनीतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. मिराज-2000 च्या तीन स्क्वाड्रनना आधुनिक रडार, एव्हियोनिक्स आणि क्षेपणास्त्र प्रणालींनी अपग्रेड करण्यात आले आहे, ज्यामुळे त्याची मल्टी-रोल क्षमता कायम आहे. हे विमान इंटरसेप्शन आणि स्ट्राईक अशा दोन्ही प्रकारच्या मोहिमांसाठी सक्षम असून F-16 फायटिंग फाल्कन आणि चेंगडू J-10 सारख्या विमानांना प्रभावीपणे टक्कर देऊ शकते.

'धुरंधर- २ मध्ये चित्रित केलेल्या कठोर वास्तवामुळे विरोधकांकडून विरोध'

आणखी दोन भारतीय एलपीजी टँकर होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडणार

दक्षिण आफ्रिकेचा पराभव, न्यूझीलंडचा जलवा!

या विस्ताराला डसॉल्ट एव्हिएशनचेही समर्थन मिळाले आहे. कंपनीने २०३५ नंतरही तांत्रिक मदत आणि स्पेअर पार्ट्स उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच, जागतिक स्तरावर निवृत्त होणाऱ्या विमानांमधून मिळणारे अतिरिक्त सुटे भाग (spares) देखील या ताफ्याची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास मदत करतील. हा निर्णय केवळ संख्यात्मक संतुलन राखण्यासाठी नाही, तर रणनीतिक लवचिकता सुनिश्चित करण्यासाठीही महत्त्वाचा आहे. यामुळे राफेल आणि HAL तेजस Mk2 सारख्या नवीन प्लॅटफॉर्म पूर्णपणे कार्यरत होईपर्यंत एक मजबूत 'सेफ्टी नेट' तयार होईल. दरम्यान, ११४ मल्टी-रोल फायटर एअरक्राफ्ट (MRFA) कार्यक्रमही पुढे चालू आहे, मात्र त्याची डिलिव्हरी होण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. त्यामुळे मिराज-2000 चा वाढवलेला वापर हवाई दलाच्या ऑपरेशनल क्षमतेला टिकवून ठेवण्यासाठी निर्णायक ठरेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka