Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोतीबिंदूवाल्यांना कधी लाभेल वॉशिंग्टन पोस्टची 'दिव्य दृष्टी'?

मोतीबिंदूवाल्यांना कधी लाभेल वॉशिंग्टन पोस्टची 'दिव्य दृष्टी'?

NEWS डंका 2 weeks ago

. बंगालच्या विजयाने जागतिक स्तरावर आश्चर्यकारक परिणाम घडवला आहे. घोर भाजपा विरोधी मानल्या जाणाऱ्या आणि अमेरिकेच्या 'डीप स्टेट'चा अविभाज्य घटक असणाऱ्या 'वॉशिंग्टन पोस्ट'ने नांगी टाकत पूर्ण यू-टर्न घेतलेला आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत हा इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील एक मोठी शक्ती म्हणून उदयाला येत असून, हा भारत पश्चिमी देशांसाठी आधारस्तंभ ठरू शकेल,' असा दावा 'मोदीज इलेक्टोरल ट्रायम्फ सिमेंट हीज लीगसी' या ७ मे रोजी प्रकाशित झालेल्या लेखात केलेला आहे. हिंदुत्वाबाबतही या लेखात बरेच काही लिहिले गेले आहे. आश्चर्य आहे की, महाराष्ट्रातील अनेक चिरीमिरी पाकीट पत्रकार प. बंगालमधील विजयानंतर भाजपाच्या नावाने कडाकडा बोटे मोडत असताना, जेफ बेझोस यांचा 'वॉशिंग्टन पोस्ट' मात्र भाजपाच्या विजयाबाबत सकारात्मक विवेचन करतो, हे विशेष.

जेफ बेझोस हा काही छोटा-मोठा माणूस नाही; तो ॲमेझॉनचा मालक आहे. 'नॅश होल्डिंग' या कंपनीने २५० दशलक्ष डॉलर्स देऊन २०१३ मध्ये वॉशिंग्टन पोस्ट विकत घेतला होता. मोदी सत्तेवर आल्यापासून या वर्तमानपत्राची भूमिका भाजपा विरोधी आणि मोदी विरोधी राहिलेली आहे. प. बंगालच्या दिग्विजयानंतर मात्र बेझोसला ही भूमिका बदलणे भाग पडलेले दिसते. मोदींची लोकप्रियता त्याच्या मालकीच्या वॉशिंग्टन पोस्टने मान्य केली आहे. 'मोदी हे निर्विवादपणे भारताचे सर्वात लोकप्रिय नेते आहेत आणि जगातील शक्तिशाली नेत्यांमध्ये त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे,' अशी स्तुतिसुमने वॉशिंग्टन पोस्टच्या ताज्या लेखात उधळण्यात आलेली आहेत. मोदी या प्रशंसेला २०१४ मध्येही पात्र होते; मात्र हे कौतुक आता होते आहे, त्याची कारणे वेगळी आहेत. २०१० पासून ॲमेझॉनने भारतात आजवर ४० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. २०३० पर्यंत ही गुंतवणूक आणखी ३५ अब्ज डॉलर्सने वाढवण्याचा बेझोस यांचा इरादा आहे; त्यांनी तशी घोषणाही केली आहे. जागतिक अर्थव्यवस्था हेलकावे घेत असताना भारताचे तारू मात्र मजबुतीने पुढे जात आहे, असे जागतिक वित्तसंस्था सातत्याने सांगत आहेत. हे तथ्य बेझोस यांना ठाऊक आहे आणि भारतीय बाजाराची ताकदही त्यांना माहीत आहे. त्यामुळेच बेझोस यांनी नमते घेतलेले दिसते. हे मान्य जरी केले, तरी गेल्या १२ वर्षांच्या काळात बेझोससारख्या धनदांडग्याला झुकावे लागेल इतपत मोदींनी भारताला मजबूत केले, हेही स्वीकारावे लागेल.

हडसन इन्स्टिट्यूटचे अभ्यासक आणि राजकीय-सामरिक विश्लेषक असलेल्या बिल ड्रेक्सेल यांनी हा लेख लिहिलेला आहे. हा लेख म्हणजे एक सुखद धक्का आहे. वॉशिंग्टन पोस्ट हे भाजपाची पोटदुखी असलेले वर्तमानपत्र; भाजपावर विभाजनवादी अजेंडाचा आरोप करणारे, मुस्लिम विरोधी ठरवणारे आणि मोदींवर हुकूमशाहीचा आरोप करणाऱ्या बड्या जागतिक मीडियापैकी एक. वॉशिंग्टन पोस्टने या अचानक घेतलेल्या यू-टर्नमुळे जागतिक राजकारणाच्या मंचावर मोदींच्या वाढत्या प्रभावाची झलक मिळाली आहे.

या लेखात बिल ड्रेक्सेल यांनी हिंदुत्वाबाबत अत्यंत समतोल विचार मांडलेले आहेत. ड्रेक्सेल हिंदुत्वाकडे केवळ एक 'धार्मिक चळवळ' म्हणून न पाहता, ती आता भारतीय सभ्यतेची ओळख बनली आहे, असे भाष्य करतात. बंगालमधील विजय हा त्यांना 'सांस्कृतिक एकत्रीकरणाचा' संकेत वाटतो. हिंदुत्व आता केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ती आता भारतीय सभ्यतेची ओळख बनली आहे, अशी ते मांडणी करतात. बंगालसारख्या प्रबळ भाषिक अभिमान असलेल्या राज्यानेही ती स्वीकारली आहे. भाजपने स्वामी विवेकानंद आणि सुभाषचंद्र बोस यांंसारख्या स्थानिक महापुरुषांशी हिंदुत्वाची जोडणी करून त्याचे 'बंगालीकरण' यशस्वीपणे केले, असे यात नमूद केले आहे.

१३ चेंडूत अर्धशतक! उर्विल पटेलची चेपॉकवर षटकारांची सुनामी

मोदी रेवंथ रेड्डींना म्हणाले, माझ्यासोबत या!

दुर्मिळ पक्ष्यांच्या शोधात गेले… आणि ठरले हंता व्हायरसचे 'पेशंट झिरो'!

काश्मीरमध्ये गोल्फ टुरिझमला मोठी चालना

हिंदुत्वाला केवळ उच्चवर्णीयांची मक्तेदारी असल्याचा दावा भारतातील तथाकथित पुरोगामी आणि डावे करत असताना, ड्रेक्सेल हे हिंदुत्व तळागाळापर्यंत झिरपले असल्याचे स्पष्ट करतात. भाजपने पश्चिम बंगालमधील अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांना एकत्र आणण्यासाठी हिंदुत्वाचा वापर कसा केला, यावर लेखात त्यांनी झगझगीत प्रकाश टाकला आहे. याचा अर्थ हिंदुत्व बदलले आहे असे नाही; हिंदुत्व ही अत्यंत सकारात्मक आणि पवित्र अशी संकल्पना आहे. विदेशी तज्ज्ञांना त्याची आता हळूहळू उकल होऊ लागलेली आहे; ते सकारात्मकतेने हिंदुत्व समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

अनेक वर्षे सतत भाजपाला झोडल्यानंतर आता अगदीच नतमस्तक झाल्यासारखे वाटू नये, म्हणून 'स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन' या उपक्रमावरून भाजपाला झोडण्याचे कामही ड्रेक्सेल यांनी केले आहे. बंगालमधील मतदार यादीतून ९० लाख नावे वगळल्याच्या मुद्द्याचा उल्लेख करत, 'प्रशासकीय स्वच्छता' आणि 'राष्ट्रीय सुरक्षा' यांच्या नावाखाली अल्पसंख्याकांचे आवाज कसे क्षीण केले जात आहेत, असा सूर लेखात लावलेला असला, तरी लेखात एरव्ही ठायी ठायी जाणवणारा आकस दिसत नाही.

हिंदुत्वाकडे लोकशाहीला असलेला 'धोका' म्हणून पाहणारे आता त्याच हिंदुत्वाला नव्या चष्म्याने बघताना दिसतायत. हिंदुत्व हा आता धर्मनिरपेक्षतेला केवळ पर्याय राहिलेला नाही, तर त्याने त्याची जागा घेतली आहे, असे यात म्हटले आहे. बंगालचा 'अभेद्य किल्ला' सर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पक्षाला केवळ हिंदी भाषिक पट्ट्यापुरते मर्यादित न ठेवता, खऱ्या अर्थाने अखिल भारतीय शक्तीमध्ये रूपांतरित केले आहे. विदेशी अभ्यासकांना भारताच्या राजकारणाची फारसी माहिती आहे असे दिसत नाही; भाजपाने कर्नाटकात सत्ता स्थापन करून 'हिंदी पट्ट्यातील पक्ष' ही ओळख कधीच पुसून टाकली आहे. महाराष्ट्रात २०१४ पासून भाजपाची सत्ता आहे. आंध्र आणि तेलंगणामध्ये भाजपाची ताकद आहे; केरळमध्ये भाजपाची ताकद सातत्याने वाढते आहे. आता पूर्वेकडे भाजपाने मुसंडी मारली आहे, ही बाब सत्य आहे. परंतु एकूणच विदेशी अभ्यासकांना भारताच्या राजकारणाचे सूक्ष्म बारकावे अजूनही उलगडलेले नाहीत, असेच म्हणावे लागेल.
या निकालांनी भारतातील आधीच कमकुवत झालेल्या विरोधी पक्षांना मोठा धक्का दिला आहे आणि ममता बॅनर्जी, ज्या मोदींच्या सर्वात प्रबळ राष्ट्रीय प्रतिस्पर्धी म्हणून उदयास आल्या होत्या, त्यांचे राजकीय महत्त्व प्रभावीपणे संपवले आहे. २०२९ मध्ये विक्रमी चौथ्या कार्यकाळासाठी एक स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण मार्ग तयार झाला आहे, असे मत ड्रेक्सेल यांनी निःसंदिग्धपणे मांडले आहे. ममतांच्या लोकप्रियतेपेक्षा मोदींच्या 'कल्याणकारी प्रशासन मॉडेल'ने अखेर बाजी मारली आहे, असे ते मान्य करतात.

मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाचा अश्वमेध २०१४ पासून सुरू झाला; बंगालचा विजय हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. २०२१ पर्यंत मोदींना वादग्रस्त नेता ठरवणारा वॉशिंग्टन पोस्ट आता त्यांना भारताचे भाग्य बदलणारा जागतिक दर्जाचा मुत्सद्दी म्हणून स्वीकारतो आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंगालला लोकशाहीची अखेरची गढी मानणारा 'पोस्ट' आता भाजपाला प्रादेशिक पक्षांचा स्वाभाविक पर्याय मानतो आहे. कधीकाळी विरोधकांच्या ईव्हीएम प्रचाराला डोक्यावर घेणारे हे वर्तमानपत्र प. बंगालमध्ये झालेल्या ९३ टक्के मतदानाला लोकशाहीची जिवंत शक्ती म्हणून स्वीकारत आहे. हिंदुत्वाला विभाजनकारी शक्ती म्हणून हिणवणारे, त्याच हिंदुत्वाला भारतीय सभ्यतेची ताकद म्हणून नवी ओळख देत आहेत. अर्थात हिंदुत्व बदललेले नाही, तर जागतिक मीडियाचा चष्मा बदललेला आहे.

जे जेफ बेझोसला दिसले, जे वॉशिंग्टन पोस्टने मान्य केले, ते मराठी पत्रकारांना दिसत नाही. भाजपा द्वेषाचा मोतीबिंदू झाला असेल, तर चष्मे बदलूनही फारसा उपयोग होत नाही. शरद पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हेच ज्यांच्या दृष्टीने कर्तृत्वाचे एव्हरेस्ट आहेत, त्यांना मोदींचे कर्तृत्व दिसावे तरी कसे?

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka