जगप्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांचा समावेश
पाकिस्तानच्या काराकोरम पर्वतरांगांतील जगातील १२व्या क्रमांकाच्या उंच ब्रॉड पीक (८,०४७ मीटर) पर्वतावर भीषण हिमस्खलन झाल्यानंतर जगप्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक निर्मल पुर्जा (निम्स दाई) यांच्यासह १० आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक बेपत्ता झाले आहेत.
दुर्घटनेनंतर या गिर्यारोहकांशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नसून त्यांचा शोध घेण्यासाठी मोठे बचाव अभियान सुरू करण्यात आले आहे.
अल्पाइन क्लब ऑफ पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार, हे हिमस्खलन ब्रॉड पीकच्या सुमारे ८,००० मीटर उंचीवरील मार्गावर झाले. दुर्घटनेच्या वेळी निर्मल पुर्जा यांच्या नेतृत्वाखालील पथक शिखराकडे जात होते. हिमस्खलनानंतर संपूर्ण पथकाशी संपर्क तुटला असून त्यानंतर कोणताही संदेश किंवा लोकेशन मिळालेले नाही. या मोहिमेत पाच नेपाळी गिर्यारोहक, पाकिस्तानमधील सोहेल साखी, अमेरिकेतील मॅलरी गीस, चीनचे वँग, ओमानमधील एक गिर्यारोहक तसेच आणखी एका परदेशी गिर्यारोहकाचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दुर्घटनेनंतर अल्पाइन क्लब ऑफ पाकिस्तानने सरकारी यंत्रणांशी समन्वय साधत हेलिकॉप्टर आणि इतर बचाव साधने तातडीने तैनात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र खराब हवामान, सततची बर्फवृष्टी आणि अत्यंत उंचीमुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
निर्मल पुर्जा हे जगातील सर्वाधिक ख्यातनाम गिर्यारोहकांपैकी एक मानले जातात. २०१९ मध्ये त्यांनी अवघ्या १८९ दिवसांत जगातील ८,००० मीटरपेक्षा उंच असलेली सर्व १४ शिखरे सर करून जागतिक विक्रम केला होता. त्यांच्या या कामगिरीवर आधारित '१४ पीक्स: नथिंग इज इम्पॉसिबल' हा माहितीपटही प्रदर्शित झाला होता. त्यांच्या बेपत्ता झाल्याच्या वृत्तामुळे जागतिक गिर्यारोहण क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; तरुणीविरोधात एफआयआर
ऑगस्टमध्येही बरसणार मान्सून; पावसाची तूट कमी होऊन १४ टक्क्यांवर
मोदींच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणी मेटा इंडियाच्या प्रमुखांविरोधात गुन्हा
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्यात आढळला पाकिस्तानी फुगा
ब्रॉड पीक हे काराकोरम पर्वतरांगांतील अत्यंत कठीण आणि धोकादायक शिखरांपैकी एक मानले जाते. अलीकडील दिवसांत या परिसरात सातत्याने हिमवृष्टी आणि प्रतिकूल हवामान असल्याने हिमस्खलनाचा धोका वाढल्याचे गिर्यारोहण तज्ज्ञांनी सांगितले आहे. शोध आणि बचाव मोहीम सुरू असून बेपत्ता गिर्यारोहकांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

