रोजच्या प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार
पुणेकरांच्या खिशाला आता रिक्षा प्रवासाचा आणखी भार सहन करावा लागणार आहे. १ सप्टेंबरपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षाचे सुधारित भाडेदर लागू झाले आहेत.
नव्या दरानुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठीचे किमान भाडे २५ रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी प्रवाशांना २० रुपये मोजावे लागणार आहेत. पुणे जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली. वाढता इंधन खर्च, वाहनांची देखभाल, विमा आणि इतर खर्च लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या भाडेवाढीचा सर्वाधिक परिणाम दररोज रिक्षाने प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांवर होणार आहे. विशेष म्हणजे, २०२१ पासून पुण्यात रिक्षाच्या भाड्यात झालेली ही चौथी वाढ आहे. पाच वर्षांपूर्वी १८ रुपये असलेले किमान भाडे आता ३० रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवासाच्या खर्चात लक्षणीय वाढ होणार असून, आधीच महागाईचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या मासिक बजेटवर त्याचा अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता आहे.
उत्तराखंडमध्ये मान्यता नसलेले मदरसे होणार बंद!
दरम्यान, सुधारित भाडे आकारताना प्रवाशांची फसवणूक होऊ नये यासाठी सर्व रिक्षांचे मीटर नव्या दरांनुसार कॅलिब्रेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी रिक्षाचालकांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत प्रत्येक रिक्षामध्ये अधिकृत भाडे तक्ता लावणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना योग्य भाडे समजण्यास मदत होईल आणि चालक-प्रवाशांमधील वादही कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, रिक्षाचालकांसाठी खर्चाच्या वाढत्या ओझ्यापासून दिलासा देणारी ही भाडेवाढ, प्रवाशांसाठी मात्र 'प्रवास महागला' अशीच परिस्थिती निर्माण करणारी ठरणार आहे.

