इंटरपोलकडून कारवाई
उत्तर प्रदेशातील संभल येथे २०२४ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात फरार असलेला कथित सूत्रधार शारिक सट्टा याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. त्यामुळे परदेशात लपून बसलेल्या सट्टाला शोधून ताब्यात घेण्यासाठी भारतीय तपास यंत्रणांना आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
संभलमध्ये २४ नोव्हेंबर २०२४ रोजी शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार उसळला होता. आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या संघर्षात चार जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केले असून शारिक सट्टाला प्रमुख आरोपी आणि हिंसाचाराचा कथित सूत्रधार म्हणून संबोधले आहे. शारिक सट्टा बराच काळ फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी यापूर्वी अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले होते. न्यायालयात हजर न राहिल्याने त्याला घोषित फरार आरोपी ठरवण्यात आले आणि त्याच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाईही करण्यात आली होती.
जानेवारी २०२६ मध्ये संभल पोलिस आणि महसूल विभागाच्या पथकाने दीपसराय परिसरातील सट्टाच्या घरावर मालमत्ता जप्तीची कारवाई केली होती. तो परदेशात पळून गेल्याचा पोलिसांना संशय असल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, शारिक सट्टा हा कुख्यात वाहन चोर असून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात वाहन चोरीच्या प्रकरणांचा आरोप आहे. तपास यंत्रणांच्या मते, त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगारी नेटवर्कशी संबंध असल्याचा संशय आहे.
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज'आधी पुण्यात राडा
'होर्मुझ आता अमेरिकेचा प्रदेश' ट्रम्प यांचा पुनरुच्चार
कॅनडातील गुरुद्वारात चाकूहल्ला; २७ वर्षीय आरोपी अटकेत
मॅकडोनाल्ड्ससह १३ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित
रेड कॉर्नर नोटीस म्हणजे काय?
इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस ही एखाद्या देशाच्या विनंतीवरून फरार आरोपीला शोधण्यासाठी आणि उपलब्ध असल्यास त्याला तात्पुरते ताब्यात घेण्यासाठी जगभरातील कायदा अंमलबजावणी यंत्रणांना सूचना देण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. त्यामुळे सट्टा कोणत्याही देशात आढळल्यास त्याच्या ठिकाणाची माहिती मिळवणे आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुलभ होऊ शकते.

