Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सातवे सोनेरी पान लिहीले जात आहे.

सातवे सोनेरी पान लिहीले जात आहे.

NEWS डंका 2 weeks ago

.बंगालच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षराने लिहीला जाईल. आधी कम्युनिस्ट आणि नंतर तृणमूल काँग्रेस असा उण्यापुऱ्या पाच दशकांचा अंधार काळ आज अधिकृतपणे संपला. एक नवे पर्व सुरू झाले.

देशाच्या इतिहासाचे सातवे सोनेरी पान लिहीले जात आहे. हिंदू समाजाचा बुलंद आवाज बनलेले शुभेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शुभेंदू ही आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांची बंगाली आवृत्ती ठरण्याची शक्यता आहे. 'सब का साथ, सबका विकास' या घोषणेचा शुभेंदु यांनी प.बंगालपुरता कडेलोट केलेला आहे. 'जो हमारे साथ, हम उनके साथ' या नव्या घोषणेचा उद्घोष केलेला आहे.

काही दिवसांपूर्वी रा.स्व.संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी रवींद्र साठे लिखित राष्ट्रभाव या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मुंबईत आले होते. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी 'सातवे सोनेरी पान लिहीले जात आहे', असे उद्गार काढले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित सहा सोनेरी पाने या ग्रंथाचा संदर्भ या विधानाला होता. या ग्रंथात भारताच्या दैदिप्यमान इतिहासाचे सहा टप्पे सावरकरांनी मांडले आहेत. देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. त्याच वर्षी अराजकाचे आणखी एक पर्व संपुष्टात आले. मुस्लीम तुष्टीकरणाचा अभेद्य किल्ला असलेली प.बंगालमधील तृणमूल काँग्रेसची राजवट कोसळवा, हा शुभसंकेत आहे.

शुभेंदु अधिकारी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाची सत्ता असलेल्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, रालोआतील घटक दलांचे मुख्यमंत्री आणि नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शुभेंदु यांनी सर्वांना अभिवादन केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्यासमोर ते आले, तेव्हा योगींनी त्यांना भगवा गमछा घातला. उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा एकच कडकडाट केला. शुभेंदु आणि योगी यांचे समीकरण हे असे आहे.

दिल्लीत भाजप मुख्यालयासह सरकारी कार्यालयांवर हल्ल्याचा इशारा

तामिळनाडूत विजय यांचे सरकार येण्याचा मार्ग झाला मोकळा

ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्रीराम'च्या घोषणा

हार्दिक, अक्षर आणि शिवम दुबेवर भारी पडतोय हा युवा ऑलराउंडर

निवडणूक प्रचारादरम्यान कांथी दक्षिण या मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत शुभेंदु योगींच्या पायावर मस्तक ठेवले होते. जेव्हा त्यांना मीडियाने याबाबत विचारले तेव्हा ते नि:संदिग्धपणे म्हणाले की, 'योगीजी फक्त भाजपा नेते वा मुख्यमंत्री नाहीत. ते गोरखपूर मठाचे मुख्यमंहत आहेत आणि मी सनातनी आहेत, म्हणून मी त्यांच्यासमोर नतमस्तक झालो'.

योगी आणि शुभेंदु यांचे असे वेगळेच नाते असले तरी आम्ही म्हणतोय की, ते हिमंता यांची बंगाली आवृत्ती आहेत. हिमंता आणि योगी यांच्यात बरीच साम्यस्थळे आहेत. शुभेंदु आणि हिमंता यांचे मूळ काँग्रेसमध्ये आहे. काँग्रेसमध्ये असे बरेच नेते आहेत, ज्यांना काँग्रेसचे तुष्टीकरणाचे राजकारण मान्य नव्हते, घराणेशाही आणि राहुल गांधी यांचा अहंकार मान्य नव्हता, म्हणून ते बाहेर पडले. शुभेंदु यांना ममता यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांचा अहंकार मान्य नव्हता.

२०२४ मध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या समोर केलेले एक भाषण जबरदस्त गाजले. शुभेंदू म्हणाले होते की, 'मी 'सबका साथ सबका विकास' ची भाषा बोलणार नाही, माझी घोषणा आहे 'जो हमारे साथ, हम उनके साथ'. 'सबका साथ सबका विकासचा घोषा बंद करायला हवा'.' ममता यांच्यासोबत अधिकारी घराण्याचे कौटुंबिक संबंध होते. शुभेंदे यांचे वडील शिशिर अधिकारी तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत.
१९९५ मध्ये शुभेंदु काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. तृणमूलच्या स्थापनेपासून ते ममता यांच्यासोबत आहेत. २००९ मध्ये ते तामलूक मतदार संघातून लोकसभेवर गेले. २०११ मध्ये राज्यात ममता यांचे सरकार आल्यानंतर ते तृणमूल काँग्रेसचे सगळ्यात प्रभावी नेते बनले. तृणमूलची संघटना तळागाळापर्यंत वाढवण्यासाठी त्यांनी अफाट मेहनत केली. ममता बॅनर्जी यांच्या विश्वासू नेत्यांमध्ये शुभेंदु यांचा क्रमांक वरचा होता. २०१६ मध्ये त्यांच्याकडे सिंचन आणि परीवहन ही खाती होती. तृणमूलमध्ये कानामागून येऊन तिखट झालेल्या अभिषेक बॅनर्जी यांचा वाढता हस्तक्षेप आणि प्रभाव हे शुभेंदू यांच्या तृणमूलमधून बाहेर पडण्याचे कारण सांगितले जाते. परंतु ते अर्धसत्य आहे.

२०२० मध्ये शुभेंदु यांनी तृणमूलला राम राम ठोकला. ते भाजपामध्ये सामील झाले. ममता बॅनर्जी यांच्या तुष्टीकरणाच्या भूमिकेवर सडकून टीका करायला त्यांनी सुरुवात केली. 'ममता नकली हिंदू आहेत', 'हिंदू विरोधी' आहेत, 'त्यांच्या सत्ताकाळात हिंदूंना मुर्शीदाबादमधून पळ काढावा लागला', असे घणाघाती आरोप त्यांनी ममता यांच्यावर केले. ममता राजवटीत रामनवमी, दुर्गापूजेच्या दरम्यान मुस्लीम गुंडांमुळे ओढललेल्या प्रत्येक संघर्षात ते हिंदूंच्या बाजूने उतरले. यंदा भवानीपूरमधून लढताना त्यांनी 'हिंदू हिंदू भाई भाई' अशा घोषणा दिल्या.

२०२४ मध्ये त्यांनी सबका साथ… या घोषणेवर आक्षेप घेतला, तेव्हा अनेकांनी तोंडात बोटे घातली होती. तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते, कारण ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली घोषणा होती. शुभेंदू त्या घोषणेलाच जाहीरपणे मोडीत काढत होते. बर ते फक्त एकदा बोलून थांबले असेही नाही. २०२६ च्या निवडणुकीतही त्यांनी याच घोषणेचा पुनरुच्चार केला. एकदा नव्हे अनेकदा केला. मोदींनी विरोध केला नाही, कारण घोषणे मागील संताप त्यांच्याही लक्षात आला असावा.

हिमंता काय किंवा शुभेंदु काय, हे नेते काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते आहेत. ज्याला कणा आहे, ज्याचा मेंदू शाबूत आहे, जो हिंदू धर्माचा अभिमानी आहे, ज्याला देशाबद्दल प्रेम आहे, असा एकही माणूस काँग्रेसमध्ये टीकू शकत नाही. पक्षात घुसमट होते म्हणून हिमंता बाहेर पडले. ही घुसमट फक्त राजकीय नव्हती. आसाम आणि प.बंगाल या दोन्ही राज्यात बांगलादेशींच्या घुसखोरीमुळे लोकसंख्येचे गणित बिघडले. दोन्ही राज्यात मुस्लीमांचा टक्का ३५ च्या जवळपास आहे. अनेक मिनी पाकिस्तान बनले आहेत. तिथे हिंदूंवर तेच अत्याचार होतात, जे पाकिस्तानात होतात. हिंदुचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते आज या दोन्ही राज्यात मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. आज ते कडवट हिंदुत्ववादी भूमिका मांडताना दिसतायत, कारण एक हिंदू म्हणूनही त्यांची पक्षात घुसमट झालेली आहे.

संदेशखालीतील बलात्कार प्रकरण काय आहे? शाहजहान शेख नावाचा तृणमूल काँग्रेसचा नेता हिंदू महिलांना सांगत होता, 'माझ्यासोबत शय्यासोबत करा म्हणजे तुझा पती आणि मुल जिवंत राहतील'. 'माझ्या समोर विवस्त्र हो', अशा प्रकारची निलाजरी विधाने हिंदू महिलांबाबत केली जायची. एखाद्याला हे सी ग्रेड हिंदी सिनेमातील अतिरंजित प्रसंग वाटू शकतील, परतुं हेच प.बंगालचे वास्तव होते. ज्याचा पुरुषार्थ जिवंत आहे, अशा कोणत्याही हिंदूचा भडका उडवण्यासाठी ही उदाहरणे पुरेशी आहेत. काँग्रेसची संस्कृती महिलांबाबत कशी आहे हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस सरचिटणीस वेणूगोपाल यांच्या लंपटपणामुळे हरीयाणा विधानसभेत पराभव झाला, असा जाहीर आरोप झाला.

केरळमध्ये चेरीयन फिलीप हा काँग्रेस नेता निवडणुकीत विजयी झालेल्या बिंदू कृष्णा या महिला आमदाराचे अभिनंदन कऱण्याच्या नावाखाली तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत होता. कॅमेराच्या समोर हा निलाजरेपणा सुरू होता. हेच प.बंगालमध्ये घाऊक प्रमाणात होत होते. तुम्ही हिंदूंवर हिंदू महिलांवर वाट्टेल तसे अत्याचार करा, परंतु माझी खुर्ची शाबूत ठेवा, हे ममता यांचे धोरण होते. प.बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पोसलेले मुस्लीम गुंड हिंदूं महिलांवर वासनेचे हेच प्रयोग करत होते. त्यामुळे शुभेंदु यांचे रक्त खवळले नसेल ?

'जो हमारे साथ हम उनके साथ', ही घोषणा नाही, हा शुभेंदु यांचा संताप आहे. या देशातील बहुसंख्य मुस्लीमांना सरकार कसे काम करते, किती विकास योजना, जनहीताच्या योजना राबवते, लोकांचे किती भले करते त्याच्याशी काहीही संबंध नाही.

हिंदूच्या सणावारांवर बंदी आणणारे, मुस्लीमांचा कट्टरतावाद चोबाळणारे, सेक्युलॅरीझमच्या नावाखाली हिंदूंना टाचे खाली दडपणारे, जातीपातीच्या नावाखाली त्यांच्यात फूट पाडणारे पक्ष मुस्लीमांना प्रिय असतात. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या राजवटीत शून्य विकास झाला, कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली तरीही मुस्लीम अखिलेश यादव यांच्या पक्षाच्या मागे ठामणे उभे असतात. प.बंगालमध्ये ३४ वर्षांच्या सत्ताकाळात उद्योगधंद्याची माती करण्याचे काम डाव्यांनी केले. त्यानंतर १५ वर्षे ममता बॅनर्जी यांनी केले. उत्पन्नाचा स्त्रोत नसल्यामुळे लोकसंख्येचा एक मोठा टक्का त्यांच्या राज्यात सरकारी योजनांतून मिळणाऱ्या रकमेवर जगत होता. तरीही इथला मुस्लीम समाज ममता यांच्या पाठिशी राहीला. ज्यांचे जे ८० आमदार विजयी झाले ते याच मतांमुळे. मुस्लीमांना जर विकासाशी देणे घेणे नसेल तर शुभेंदू यांना चुक कसे म्हणता येईल. 'जो हमारे साथ, हम उनके साथ', ही मुस्लीमांच्या करणीची प्रतिक्रीया आहे. हिंदू हा कधीच कट्टर नव्हता. परंतु या देशातील कट्टरवादी मुस्लीमांनी कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांना घडवले आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka