शिक्षक दिन हा आपल्या समाजातील शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे कौतुक करण्याचा दिवस आहे. हा डॉ. एस. राधाकृष्णन यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवसही आहे. काल राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या विजेत्यांना ७, लोककल्याण मार्ग येथे बोलावण्यात आले होते.
त्यावेळी काय झाले, ते पाहा,अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने एक्सवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिक्षकांशी संवाद साधताना अनेक मिश्किल घटनाही घडल्या. त्यातून शिक्षकांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधताना एका महिला शिक्षिकेने सांगितले की, त्या मुलांना नावीन्यपूर्ण पद्धतीने मुलाखत घेण्याचे प्रशिक्षण देत आहेत. यावर पंतप्रधानांनी विचारले की, मुले घरी जाऊन आई-वडिलांचीही मुलाखत घेत असतील ना? पंतप्रधानांच्या या प्रश्नावर महिला शिक्षिकेने होकार दिला.
यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुले आपल्या आई-वडिलांना विचारत असतील की, जेवण का बनवले? असेच का बनवले? हा निर्णय कोणी घेतला होता? त्यासाठी किती खर्च झाला? यावर महिला शिक्षिका म्हणाल्या, 'माझ्या शाळेतील सर्व मुलांना पत्रकारच बनायचे आहे!'
एका अन्य महिला शिक्षिकेने पंतप्रधान मोदींना सांगितले की, त्या मुलांना रसायनशास्त्र शिकवण्याबरोबरच पर्यावरण शिक्षणही देतात. तसेच त्या मुलांना आत्मविश्वासाने सार्वजनिक वक्तृत्व करण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि त्यांना राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांपर्यंत पोहोचवले आहे.
यावर पंतप्रधानांनी विचारले, 'तुम्ही मुलांना सार्वजनिक ठिकाणी कसे बोलायचे हे शिकवता. जर मी तुमचा विद्यार्थी आहे आणि मला एक चांगला वक्ता बनायचे असेल, तर मी काय केले पाहिजे? काही टिप्स द्या.'
सोन्याने पाच वर्षांत करुन दिली तिप्पट कमाई
यावर शिक्षिकेने उत्तर दिले, 'तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. यावर त्या शिक्षिका हसू लागल्या आणि म्हणाल्या की, तुमची आभा पाहून मला थोडेसे दडपण आले. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, म्हणजे तुम्हाला सार्वजनिक वक्ता व्हायचे असेल, तर तुमच्यात अशी आभा नसावी. महिला शिक्षिकेने सांगितले की, आभा असली पाहिजे. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मग तर लोक ऐकणारच नाहीत, ते फक्त आभाच पाहत राहतील.' महिला शिक्षिका म्हणाल्या, 'तुम्हाला तर पाहतच राहतील.'
संवाद पुढे नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एखादे मूल शिक्षणात कदाचित चांगले नसेल. पण परमात्म्याने प्रत्येकाला कोणती ना कोणती ताकद दिली आहे. मुलामधील प्रतिभा ओळखण्यासाठी तुम्ही शिक्षक काही प्रयत्न करता का? यावर एका महिला शिक्षिकेने सांगितले, 'आम्ही खूप प्रयत्न करतो. खरं तर तोच आमचा प्रयत्न असतो. कारण माझे असे मत आहे की, आमच्या शाळेत किंवा आमच्या वर्गात जितकी मुले आहेत, त्या सर्वांमध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. वेगवेगळी प्रतिभा आहे, वेगवेगळी आव्हाने आहेत आणि एक शिक्षिका म्हणून मी त्या सर्व प्रतिभांची ओळख करून घेते.'
एका पुरुष शिक्षकाने सांगितले, 'आपण एकलव्य सुरू करून केवळ एक शाळा तयार केलेली नाही, तर माझ्या मते अनेक कुटुंबांना जोडले आहे. अशा लोकांना जोडले आहे, जे त्यांच्या कुटुंबातील शाळेत जाणारी पहिली पिढी आहेत आणि ज्यांनी कधी शाळाही पाहिलेली नव्हती. त्यांची मुले आज आमच्याकडून राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे स्वप्न पाहत आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरत आहेत.'
एका महिला शिक्षिकेने सांगितले, 'माझ्या संशोधनाचा विषय स्तनाचा कर्करोग हा राहिला आहे. स्तनाचा कर्करोग आजही असा विषय आहे, ज्याबद्दल महिला बोलण्यास खूप संकोच करतात. आपल्या क्षमतेत काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. उदाहरणार्थ, प्राथमिक तपासणी किंवा त्यांना काही अशा गोष्टी सांगणे, ज्यामुळे त्यांना स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे ओळखता येतील आणि डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे हे समजू शकेल. मी या विषयांवर काम करते.'
यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, 'तुम्ही याच विषयावर काम करत आहात, तर मी काशीचा खासदार आहे. मी तिथे स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती अभियान सुरू केले आहे.
पंतप्रधान म्हणाले, 'आता अमली पदार्थांचे उदाहरण घ्या. अनेकदा काय होत आहे हे कळतही नाही. कोणी येतो आणि काहीतरी देऊन जातो. याबाबत शिक्षकांमध्ये सातत्याने जागरूकता आहे का? एखाद्या मुलाच्या वागण्यात काही बदल होत आहे का, याचे बारकाईने निरीक्षण कोणी करत आहे का? मला संपूर्ण शिक्षण क्षेत्राला सांगायचे आहे की, आपल्याला पुस्तके आणि अभ्यासक्रमाच्या बाहेर पडून मुलांच्या आयुष्यात डोकवावे लागेल. बालपणाला मरू द्यायचे नाही आणि बालपण टिकवून ठेवण्याचे सर्वात मोठे काम शिक्षकच करू शकतो.'

