Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिर्डीत आता क्षेपणास्त्रे, तोफगोळे, ड्रोन यांचे उत्पादन

शिर्डीत आता क्षेपणास्त्रे, तोफगोळे, ड्रोन यांचे उत्पादन

बनणार संरक्षण क्षेत्राचे नवे केंद्र

साईबाबांच्या भक्तीमय वातावरणासाठी जगभर प्रसिद्ध असलेले शिर्डी आता देशाच्या संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाणार आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते शनिवारी शिर्डीत अत्याधुनिक डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला मोठी चालना मिळणार असून 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला नवे बळ मिळणार आहे. शिर्डीतील हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशाच्या संरक्षण स्वावलंबनासाठीही ऐतिहासिक पाऊल मानला जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे सुमारे २०० एकर परिसरात उभारण्यात आलेल्या या संरक्षण उत्पादन संकुलात क्षेपणास्त्रे, ड्रोन, तोफगोळे, स्फोटके आणि एरोस्पेस उपकरणांचे उत्पादन केले जाणार आहे. या प्रकल्पामध्ये दरवर्षी तब्बल पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता विकसित करण्यात आली असून खासगी क्षेत्रातील हा देशातील सर्वात मोठा तोफगोळा उत्पादन प्रकल्प मानला जात आहे. यामुळे भारतीय सैन्यदलाला देशातच तयार होणारी आधुनिक आणि अत्याधुनिक शस्त्रसामग्री उपलब्ध होणार आहे.

भाजपमध्ये प्रवेशानंतर राघव चड्ढा यांच्यावर मोठी जबाबदारी

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

इराण-अमेरिका कराराबाबत अनिश्चितता

उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी भविष्यात देशातील प्रमुख संरक्षण आणि एरोस्पेस उद्योग केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र सरकार संरक्षण क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देत असून यामुळे राज्यातील औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात भारत आता केवळ शस्त्रास्त्र आयात करणारा देश राहिला नसून जगातील प्रमुख संरक्षण निर्यातदार देशांमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट केले. संरक्षण उत्पादन क्षेत्रात खासगी उद्योगांचा सहभाग वाढवणे ही काळाची गरज असून भविष्यात हा सहभाग ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. 'आत्मनिर्भर भारत' ही केवळ घोषणा नसून भारताच्या सामरिक शक्तीचा नवा पाया आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रकल्पांतर्गत ड्रोन तंत्रज्ञान, आधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली, आरडीएक्स आणि विविध स्फोटक सामग्री उत्पादनाशी संबंधित युनिट्स उभारण्यात येत आहेत. यावेळी 'सूर्यास्त्र' रॉकेट लॉन्चर प्रणालीचे सादरीकरणही करण्यात आले. भविष्यातील युद्धांमध्ये ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान यांनी सांगितले.

या डिफेन्स हबमुळे स्थानिक युवकांसाठी हजारो रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. शंभरहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या प्रकल्पाशी जोडले जाणार असून शिर्डी आता भक्तीबरोबरच देशाच्या सामरिक शक्तीचेही नवे प्रतीक बनणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka