Dailyhunt
शिवसेनेकडून ज्योती वाघमारे तर, राष्ट्रवादीकडून पार्थ पवार जाणार राज्यसभेवर

शिवसेनेकडून ज्योती वाघमारे तर, राष्ट्रवादीकडून पार्थ पवार जाणार राज्यसभेवर

NEWS डंका 1 month ago

भाजपने पूर्वीच त्यांचे चार उमेदवार जाहीर केले होते

राज्यसभा निवडणुकीसाठी गुरुवार, ५ मार्च रोजी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे उघड केली आहेत.

महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या सात जागांसाठी भाजपने बुधवारी आपले चार उमेदवार जाहीर केले होते. यानंतर महायुतीतील उर्वरित दोन पक्षांमधून कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू असतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.

राज्यसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेकडून मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. जुन्या चेहऱ्यांना संधी न देता नव्या चेहऱ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संधी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आली आहे. तर भाजपने चार उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेकडून ज्योती वाघमारे, राहुल शेवाळे आणि शायना एन.सी. या चार नावांवर चर्चा सुरू होती. यामध्ये ज्योती वाघमारे आणि राहुल शेवाळे यांची नावे आघाडीवर मानली जात होती. मात्र अखेर पक्षाने ज्येष्ठांना डावलत ज्योती वाघमारे यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

भाजपकडून चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विनोद तावडे, रामराव वडकुते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माया इवनाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. त्यानुसार भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

भारतीय तळांचा अमेरिकेकडून वापर नाही!

'ट्रम्प, बायडेन यांच्या हत्येसाठी इराणी हेरांनी दिले होते काम'

भारताला ९.५ दशलक्ष बॅरल तेल पाठवण्यास रशिया तयार

राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या ३७ जागांसाठी मतदान पार पडणार असून यामध्ये सात जागा या महाराष्ट्रातील आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर ६ मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी ९ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया १६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल जाहीर केले जातील.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka