एनआयएकडून कारवाई
श्रीनगरमधील हजरतबल परिसरातील दनिहामा गावात असलेली एक निवासी मालमत्ता राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जप्त केली आहे. ही मालमत्ता आरोपी गुलाम मोहम्मद मीर ऊर्फ 'मामा गॅस' याच्या मालकीची आहे.
प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी (एलईटी) संबंधित सीमापार दहशतवादी कटाच्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
एनआयएने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, संस्थेच्या महासंचालकांची आवश्यक मंजुरी घेतल्यानंतर बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा, १९६७ च्या कलम २५ अंतर्गत ही मालमत्ता जप्त करण्यात आली. तपासात या मालमत्तेचा आणि दहशतवादी कटाचा थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी तसेच दहशतवादी नेटवर्कशी संबंधित आक्षेपार्ह वस्तू लपवण्यासाठी या जागेचा वापर केला जात होता.
३१ मार्च २०२६ रोजी श्रीनगरमधील जकूरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला होता. त्यानंतर एनआयएने हा तपास स्वतःकडे घेऊन नव्याने गुन्हा नोंदवला. तपासादरम्यान स्थानिक ओव्हरग्राउंड वर्कर्सच्या (ओजीडब्ल्यू) नेटवर्कचा शोध लागला. हे लोक पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या सूत्रधारांसोबत मिळून काम करत होते.
सरकारी आस्थापना, सुरक्षा दल आणि नागरिकांवर हल्ले करण्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास, हालचाली करण्यास, आश्रय मिळवून देण्यास आणि आवश्यक रसद पुरवण्यास हे स्थानिक मदतनीस सहाय्य करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
दिल्लीतील जंतरमंतर आता आंदोलनस्थळ नाही!
ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांना मातृशोक
६ एप्रिल २०२६ रोजी श्रीनगरच्या हजरतबल परिसरातील दनिहामा गावात गुलाम मोहम्मद मीर याच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. या वेळी अबू हुरैरा आणि खुबैब या दोन संशयित दहशतवाद्यांना शोधण्यात आले. हे दोघे लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. घरातून स्फोटकांसारखा पदार्थ, डिजिटल उपकरणे आणि इतर आक्षेपार्ह वस्तूही जप्त करण्यात आल्या होत्या. तपासात आरोपीने जाणूनबुजून आपल्या घराचा वापर दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून होऊ दिल्याचे तसेच त्यांच्या कारवायांना मदत करण्यासाठी स्वतःच्या मालमत्तेचा वापर करू दिल्याचे निष्पन्न झाल्याचे एनआयएने म्हटले आहे.

