Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोन्या-चांदीच्या दरात घसरण

सोन्या-चांदीच्या दरात घसरण

खरेदीदारांना दिलासा, गुंतवणूकदार सतर्क

देशातील सराफा बाजारात गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या किमतींमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत होता.

मात्र आजच्या घसरणीमुळे दागिने खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने बाजारात पुन्हा एकदा खरेदीची लगबग वाढताना दिसत आहे.

आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात घट नोंदवण्यात आली असून २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दरही कमी झाले आहेत. दुसरीकडे, चांदीच्या किमतींमध्ये तब्बल हजारो रुपयांची घसरण झाल्याने गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांचे लक्ष या बाजाराकडे वेधले गेले आहे. गेल्या दोन दिवसांतील चढ-उतारामुळे सराफा बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असले तरी ग्राहकांसाठी ही घसरण फायदेशीर मानली जात आहे.

वांद्रे येथील अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान दगडफेक करणाऱ्या १६ जणांना अटक

अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या जहाजावरील २० इराणी खलाशी परतले मायदेशी

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने आणि अमेरिकेतील बाँड यिल्ड वाढल्याने सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाला. त्याचबरोबर जागतिक स्तरावर काही प्रमाणात तणाव कमी झाल्याचे संकेत मिळाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे होणारा ओढा कमी झाला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर नरमल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून आला.

एमसीएक्सवरही सोन्या-चांदीच्या व्यवहारात मोठी अस्थिरता दिसून आली. सुरुवातीला दर वाढलेले दिसत असताना नंतर विक्रीचा दबाव वाढल्याने दर घसरले. चांदीमध्येही दिवसभर मोठे चढ-उतार सुरू होते. आगामी काळात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाचा परिणाम बाजारावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सध्या सावध भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.

मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात काही प्रमाणात फरक दिसून येत आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतिग्राम १५ हजार ७०० रुपयांच्या आसपास असून २२ कॅरेट सोन्याचा दर १४ हजार ३०० रुपयांच्या पुढे व्यवहार करत आहे. चांदीचा दरही घसरून प्रतिकिलो सुमारे २ लाख ८० हजार रुपयांच्या आसपास पोहोचला आहे.

दरम्यान, लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक मानली जात आहे. मात्र बाजारातील सततची अस्थिरता लक्षात घेता गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka