महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसी परिसरात केलेल्या कारवाईत तब्बल ४,७१० लिटर भेसळयुक्त आणि संशयित भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट करण्यात आले.
या दुधाची किंमत सुमारे १ लाख ८५ हजार ७८० रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात पनीर, स्किम्ड मिल्क पावडर आणि क्रीमही जप्त करण्यात आले. या प्रकरणी १५ व्यक्ती आणि संस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित आस्थापनांचे अन्न सुरक्षा परवाने रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
ठाणे जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, एफडीएच्या विशेष पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर १९ ऑगस्ट रोजी तळोजा एमआयडीसीतील पी. के. डेअरीवर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान शेखिद श्यामलाल जयस्वाल हा टँकरमध्ये दूध तयार करताना आढळून आला. तपासात दूध भेसळ करण्यासाठी स्किम्ड मिल्क पावडर आणि पेंटचा वापर केला जात असल्याचे समोर आल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. डेअरीचे मालक प्रदीप कमलेश यादव यांच्या सांगण्यानुसार हा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एफडीएच्या तपासात भेसळीची धक्कादायक पद्धत समोर आली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, १ किलो स्किम्ड मिल्क पावडरमध्ये ८ ते १० लिटर थंड पाणी मिसळले जात होते. ब्लेंडरच्या मदतीने हे मिश्रण दुधात मिसळून तयार केले जात होते. त्यानंतर हे मिश्रण गायीचे किंवा म्हशीचे शुद्ध दूध असल्याचे भासवून विविध डेअरी आणि विक्रेत्यांना पुरवले जात असल्याचा आरोप आहे. तपासात हे भेसळयुक्त दूध ठाणे, ऐरोली, कोपरी, दिघा आणि घणसोली परिसरातील डेअरी आणि विक्रेत्यांकडे पाठवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित डेअरी वैध अन्न सुरक्षा परवान्याशिवाय सुरू असल्याचेही FDAच्या पथकाला आढळले. त्यानंतर प्रशासनाने डेअरी तातडीने बंद केली. याशिवाय पथकाने १२९.५ किलो पनीर, ४७३ किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि ८८.४ किलो क्रीम जप्त केले.
अपात्रता याचिकेसंदर्भात तृणमूलच्या २० बंडखोर खासदारांना नोटीस
सोन्याला 'सोन्याचा भाव'; चांदीची मात्र घसरण
'नारळ फोडणे, कापूर पेटवणे चुकीचे'; हिंदू प्रथांविरोधात पत्रकवाटप
शाळेच्या गणवेशासोबत हिजाब घालता येणार नाही!
या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एकूण १५ व्यक्ती आणि संस्थांना आरोपी करण्यात आले असून, यामध्ये दोन डेअरींचे चालक-मालक तसेच कथितरीत्या दुग्धजन्य पदार्थ स्वीकारणाऱ्या काही विक्रेता आस्थापनांचा समावेश आहे.

